धक्कादायक! जमिनीच्या वादातून जोरदार गोळीबार, ६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 01:48 PM2023-05-05T13:48:03+5:302023-05-05T13:48:47+5:30
मध्यप्रदेशच्या मुरैना येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मुरैना येथे शुक्रवारी सकाळी दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गोळीबारही केला. या घटनेत गोळी लागल्याने दोन्ही बाजूच्या ६ जणांचा मृत्यू झाला. यात अनेकजण गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वाहन चोर आंतरराज्य टोळी जेरबंद, सव्वा कोटींची १८ वाहने जप्त; सातारा पोलिसांची दबंग कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरैना येथील लेपगाव येथे राहणाऱ्या दोन पक्षांमध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून वाद सुरू होता. २०१४ मध्येही हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर आले होते. यादरम्यान एका बाजूच्या व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता. जमिनीच्या वादातून सुरू झालेले हे वैर सुरू असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा हे दोन्ही गट एकमेकांसमोर आले. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, आधी दोन्ही बाजूंनी हाणामारी झाल्या.
दरम्यान, दोन्ही बाजूच्या गटांनी देशी बनावटीच्या पिस्तुलाने एकमेकांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन्ही बाजूंच्या चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. यापैकी चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. काही लोकांना रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करून आरोपींच्या शोधासाठी छापेमारी सुरू केली आहे. सिहोनिया पोलीस स्टेशन हद्दीतील लेपा गावात एका छोट्या भूखंडावरून हे भांडण झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही बाजू या भूखंडावर आपला हक्क सांगत आहेत. २०१४ मध्येही या प्रकरणावरून त्यांच्यात भांडण झाले होते.
यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार लाठीमार झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून दुसऱ्या बाजूचा गट वाट पाहत होता. शुक्रवारी या गटाने संधी साधून हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूचे लोकही जमा झाले आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला.