अवेळी फटाके फोडणाऱ्या १०० हून अधिक तर बेकायदा विक्री करणाऱ्या ५३ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 09:24 PM2018-11-10T21:24:46+5:302018-11-10T21:25:10+5:30
बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
मुंबई - सर्वोच्च न्यायालयानेफटाके फोडण्यासाठी ठराविक वेळ घालून दिली आहे. दिवाळीदरम्यान ती वेळ न पाळणाऱ्या अनेकांवर मुंबई पोलिसांनी कारवाईच बडगा उचलला आहे. मुंबईत बहुतांश ठिकाणी गुन्हे दाखल न करता अनेकांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले आहे. या प्रकरणी शिवडी परिसरात ५ वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी फटाक्यावर बंदी न आणता सर्वोच्च न्यायालयानेफटाके वाजवण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ आखून दिली आहे. या निर्देशाची अंमलबजावणी करण्यात यावी या बद्दलच्या सूचना सर्व राज्यांना देण्यात आल्या आहेत. जी व्यक्ती रात्री १० नंतर फटाके वाजवतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यानुसार मुंबईत पहिलाच मंगळवारी दोन अज्ञात तरुणांविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, मागील दोन दिवसात रात्री शिवडी परिसरात रात्री दहानंतर फटाके वाजवणाऱ्यांवर ५ गुन्हे दाखल झाले आहे. रफी अहमद किडवाई मार्ग (आरएके) पोलिसांनी ही कारवाई केली असून ८ जणांना अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्याचप्रमाणे मरीन ड्राइव्ह पोलिसांनी नरिमन पॉईंट या ठिकाणी रात्री दहा नंतर फटाके वाजवणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले असल्याची माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली.