महिला डॉक्टरच्या फोटोत छेडछाड, ट्विटरवर बनवले अश्लील अकाउंट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:48 PM2018-10-09T13:48:07+5:302018-10-09T13:50:11+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्विटर अकाउंट 1 एप्रिल 2014 रोजी बनवण्यात आलं आहे. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने हे अकाउंट तयार करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नवी मुंबई - २५ वर्षीय डेंटिस्टचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो वापरून ट्विटरवर एक बोगस अकाउंट बनवण्यात आलं आहे. कोपरखैरणे येथे राहणारी ही पीडित डॉक्टर तरुणी आहे. एका विकृत पुरुषाने तिच्या घरी जाऊन शरीरसंबंधाची मागणी केल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
प्रदीप पटेल नामक व्यक्ती ५ ऑक्टोबरला रात्री साडे नऊच्या सुमारास पीडित तरुणीच्या घरी येऊन ठेपला. डॉक्टर तरुणीने त्याच्याशी ट्विटरवर चॅट केल्याचा आणि फोन करून त्याला घरी बोलवल्याचा दावा त्याने केला. तरुणीने आपण अशा प्रकारे कोणाशीही चॅट किंवा फोन केला नसल्याचं त्याला सांगितले. त्यावेळी त्याने तिच्या नावाने सुरू असलेल्या ट्विटर अकाउंटची माहिती तिला दिली. या अकाउंटवरूनच शरीरविक्रयाची बोलणी झाल्याचं त्याने उघड केलं. त्यावर संतापलेल्या डॉक्टर तरुणीने त्याला फैलावर घेत घरातून निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या पटेल याने तिथून पळ काढला. त्यानंतर डॉक्टर तरुणीने पटेलने दाखवलेले ट्विटर अकाउंट तपासायला सुरुवात केली. तेव्हा तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो वापरून एक बोगस ट्विटर अकाउंट तयार करण्यात आल्याचं तिच्या निदर्शनास आलं. या अकाउंटवर अतिशय अश्लील मजकूर होता आणि शरीरविक्रीसाठीच हे अकाउंट सुरु केलं असल्याचा हेतू होता. हा प्रकार समजताच तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे ट्विटर अकाउंट 1 एप्रिल 2014 रोजी बनवण्यात आलं आहे. सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने हे अकाउंट तयार करणाऱ्याचा आयपी अॅड्रेसचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.