मॉर्निंग वॉक करताय पण सावधान; धुमस्टाईलने गळयातील ऐवज केले जातायत लंपास
By प्रशांत माने | Published: August 22, 2022 03:48 PM2022-08-22T15:48:02+5:302022-08-22T15:48:20+5:30
कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक येत असतात.
प्रशांत माने
डोंबिवलीः येथील ठाकुर्लीतील ९० फिट आणि कल्याण डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर एकटे फिरणे धोकादायक झाले आहे. शनिवारी सकाळी एक महिला मॉर्निंग वॉक करत असताना तीला धक्का देत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन खेचून दोन तरुणांनी धूम स्टाईलने पळ काढल्याची घटना रेल्वे समांतर रस्त्यावर घडली आहे. ही घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
कल्याण डोंबिवली जोडणाऱ्या ठाकुर्ली समांतर रस्त्यावर सकाळी मॉर्निंग वॉकसाठी नागरिक येत असतात. हीच संधी साधत गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांकडून दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळयातील ऐवज लांबविण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. शनिवारी सकाळी याच परिसरात राहणारी महिला या रस्त्याच्या बाजुकडील पदपथावरुन मॉर्निंग वॉक करत होती. याच दरम्यान दोन तरुण दुचाकीवर महिलेच्या मागावर होते. या मधील एक तरुण दुचाकीवरून खाली उतरला त्याने पदपथावरुन चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन हिसकावली व त्यानंतर दोन्ही तरुणांनी बाईक वर धूम ठोकत कल्याणच्या दिशेने पलायन केले. सोनसाखळी चोरीच्या घटनांसह येथील म्हसोबा चौकातील रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या दुचाकी देखील चोरीला जात आहेत. हे एकूणच चोरीचे प्रकार पाहता इथे पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.