सकाळी काम; रात्री लुटमार, बँक कर्मचाऱ्याला लुटणारे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 08:27 PM2021-12-29T20:27:43+5:302021-12-29T20:28:34+5:30
Crime News : सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
डोंबिवली: ठाकुर्ली 90 फिट रोड परिसरातील श्री चामुंडा गार्डन संकुलात राहणारे बँक कर्मचारी संतोषकुमार शर्मा यांना 24 डिसेंबरच्या मध्यरात्री पाच जणांनी लुटल्याची घटना घडली होती. या चोरटयांना सीसीटिव्ही कॅमेराच्या मदतीने गजाआड करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांच्याकडून गुन्हयात वापरलेली हत्यारे आणि चोरलेला लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आले आहे.
आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व डोंबिवली पूर्वेकडील शेलारनाका परिसरातील त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीमधील राहणारे आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्त जे.डी मोरे आणि वरीष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक संदीप शेंगटे, पोलिस हवालदार विशाल वाघ, शंकर निवळे, राजेंद्र जाधव, विलास शिंदे, विकास भामरे, पोलिस नाईक प्रशांत सरनाईक, दिलीप कोती, सोमनाथ पिचड, वैजिनाथ रावखंडे. पोलिस शिपाई जयपाल मोरे, निलेश पाटील, राठोड यांच्या पथकाने कसोशिने तपास करून सीसीटिव्हीच्या आधारे या गुन्हयातील आरोपींना त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीच्या परिसरातील तबेल्याच्या जवळ सोमवारी अटक केली.
18 ते 22 वयोगटातील हे आरोपी सकाळी शहरातील सोसायटयांमध्ये साफसफाईची कामे करायचे आणि रात्री लुटमारीचे प्रकार करायचे असे तपासात समोर आल्याची माहीती पोलिस उपनिरिक्षक संदीप शेंगटे यांनी दिली. त्यांच्याविरोधात अन्य कुठल्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का? याचा तपास सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त मोरे यांनी दिली.