ठाणे शहर आयुक्तालयात बनावट फेसबुक अकाउंट बनवणाऱ्यांविरोधात सर्वाधिक गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 05:05 AM2020-12-26T05:05:18+5:302020-12-26T05:05:40+5:30
Crime News : सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते.
- जितेंद्र कालेकर
ठाणे : सोशल मीडियावर अश्लील मेसेज किंवा व्हिडीओ क्लिप टाकून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत, लैंगिक अत्याचार करण्याचे किंवा पैसे उकळण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. दोन वर्षांत अशा २५ महाभागांना अटक केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नावाचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून त्याद्वारे अश्लील शिवीगाळ करून आव्हाड यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचे फोटो फेसबुकवर प्रसारित करणाऱ्या सुनील रायभान पवार उर्फ सुनील राजे पवार (२८) याला औरंगाबाद येथून ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली आहे.
सोशल मीडियाद्वारे मैत्री करून नंतर गिफ्ट देण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूकही केली जाते. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांची फसवणूक करण्याचेही प्रकार घडतात. अशा प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे यांनी केले आहे.
गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे काय?
सायबर गुन्ह्यांसंबंधी २०१९ मध्ये ठाणे आयुक्तालयात ६० गुन्ह्यांची नोंद झाली. त्यातील १७ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले. १८ आरोपींना अटक झाली आहे. जानेवारी ते नोव्हेंबरदरम्यान ४६ गुन्हे नोंद झाले. नऊ गुन्हे उघड झाले असून, सात जणांना अटक केल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.
वर्षात सर्वाधिक गुन्हे कुठले घडले?
वर्षभरात सायबर सेलमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये फेसबुकवर अश्लील छायाचित्र प्रसारित करण्याचे प्रमाण अधिक होते. याशिवाय, फेसबुकवर बनावट खाते सुरू करून खातेधारक आजारी किंवा अडचणीत असल्याची बतावणी करीत, त्यांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली जाते.
कुठल्या महिन्यात सर्वाधिक गुन्हे?
महिना गुन्हे संख्या
जानेवारी ६
फेब्रुवारी ५
मार्च ३
एप्रिल ४
मे ६
जून १
जुलै १
ऑगस्ट ०
सप्टेंबर ५
ऑक्टोबर ९
नोव्हेंबर ६