सोशल मीडियावरील मित्रांकडून सर्वाधिक बलात्कार; मुंबई पोलिसांचा धक्कादायक अहवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:35 AM2022-02-16T05:35:47+5:302022-02-16T05:36:36+5:30
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला.
मुंबई : गेल्या तीन वर्षात मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या तरुणांकडून सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या वार्षिक अहवालातून समोर आली. यामध्ये अल्पवयीन मुलींचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे सोशल मीडिया हाताळताना सतर्क राहण्याच्या सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी मंगळवारी वार्षिक अहवाल सादर केला. यावेळी सहआयुक्त मिलिंद भारांबे (गुन्हे), विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था), निकेत कौशिक (आर्थिक गुन्हे शाखा), राजकुमार व्हटकर (प्रशासन) यांच्यासह पाचही अपर पोलीस आयुक्त तसेच सर्व पोलीस उपायुक्त हजर होते. यावेळी हेमंत नगराळे यांनी गुन्ह्याचा लेखाजोखा मांडला.
गेल्या वर्षभरात मुंबईत बलात्काराच्या ८८८ घटनांची नोंद झाली. यामध्ये ५३४ गुन्हे हे अल्पवयीन मुलींशी संबंधित होते. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन वर्षात मित्र, प्रियकर तसेच सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तीकडून सर्वाधिक मुली, तरुणी विकृत वासनेच्या शिकार ठरत असल्याचे समोर आले. गेल्यावर्षी २९९ अल्पवयीन मुलींसह २७१ तरुणी आरोपींच्या जाळ्यात अडकल्या. यामध्ये लग्नाचे आमिष दाखवत अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाकाळात सोशल मीडियाचा वावर वाढला. यातूनही या गुन्ह्यात भर पडत असल्याचा अंदाजही पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
२३ महिलांवर वडील, भाऊ तसेच मुलाकडून लैंगिक अत्याचाराच्या नात्याला काळिमा फासण्याचा घटना घडल्या आहेत. नातेवाईक (४२), कुटुंबातील मित्र (५१), लिव्ह इन पार्टनर (९), केअरटेकर (१) तसेच अन्य ओळखीच्या व्यक्तीकडून (२८) बलात्काराच्या घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. त्यामुळे महिलांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गेल्यावर्षी मुंबईत ६४,६५६ गुन्ह्यांची पोलीस दफ्तरी नोंद झाली. यापैकी ५३,१९३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये हत्या (१६२), हत्येचा प्रयत्न (३४९), दरोडा (१६), खंडणी (१४९), घरफोडी (१६८३), चोरी (४५३४), वाहन चोरी (३२८२) गुन्ह्याचा समावेश आहे.