म्यानमार, बांगलादेशातून भारतात सर्वाधिक तस्करी; ८३३ किलो सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 06:49 AM2022-12-08T06:49:18+5:302022-12-08T06:49:53+5:30

वर्षभरात डीआयआरने परदेशातून ४०५ कोटींचे सोने जप्त केले.

Most trafficked to India from Myanmar, Bangladesh; 833 kg gold seized | म्यानमार, बांगलादेशातून भारतात सर्वाधिक तस्करी; ८३३ किलो सोने जप्त

म्यानमार, बांगलादेशातून भारतात सर्वाधिक तस्करी; ८३३ किलो सोने जप्त

Next

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) परदेशातून भारतात तस्करी करून आणलेले ८३३ किलो सोने पकडले आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०५ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, आजवर भारतात होणारी सोन्याची तस्करी ही मध्य-पूर्वेकडील देशांतून होत होती. आता मात्र या तस्करीच्या मार्गामध्ये लक्षणीय बदल झाला असून, सर्वाधिक तस्करी ही म्यानमार येथून होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

सोमवारी डीआरआयने आपला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा तस्करी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये डीआरआयने हे सोने पकडले आहे. पकडलेल्या एकूण सोन्यापैकी ३७ टक्के सोने हे म्यानमार येथून भारतात आले होते, तर २० टक्के सोने हे बांगलादेशाच्या सीमेकडून भारतात आले होते. सोन्याच्या तस्करीच्या बदललेल्या मार्गाचे विश्लेषण करताना डीआरआयने नमूद केले आहे की, कोविड काळामध्ये आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर बंद होती, तसेच गेल्या काही वर्षांत विमानतळांवर तस्करी रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळेच तस्करांनी आपला मार्ग बदलत ईशान्य भारताच्या मार्गे तस्करी सुरू केली आहे. भौगोलिकदृष्ट्या, ईशान्य भारतातून म्यानमार, बांगलादेश, भूतान, नेपाळ आणि चीन, अशा पाच देशांच्या सीमा भारताशी जोडल्या जातात. आजवर येथून तस्करी फारशी होत नव्हती. मात्र, आता हा ट्रेण्ड सुरू झाल्याचे दिसून येते.

अमली पदार्थांच्या तस्करीतही विक्रमी वाढ
गेल्या आर्थिक वर्षात देशात अमली पदार्थांच्या तस्करीत त्या आधीच्या वर्षाच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली आहे. कोकेनच्या तस्करीमध्ये ३६ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३१० किलो कोकेन, ८८४ किलो मेथामॅफ्टाइन, ३४१० किलो हेरॉइन, २६,९४६ किलो गांजादेखील जप्त केला आहे. देशात विविध ठिकाणी झालेल्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात डीआरआयने एकूण १३१ लोकांना अटक केली आहे.

Web Title: Most trafficked to India from Myanmar, Bangladesh; 833 kg gold seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.