मायलेकी हल्ला प्रकरण : ‘त्या’ सोन्याच्या गंठनावर होते लक्ष, अल्पवयीनला पोलिसांनी घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 08:28 PM2022-02-11T20:28:23+5:302022-02-11T20:30:05+5:30
Robbery Case : त्यावर या चोरटयांची नजर पडली होती आणि ते चोरण्याच्या उद्देशाने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करीत दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहीती तपासात समोर आली आहे.
कल्याण - घरात घुसून दोघा चोरटयांनी वत्सला चिकणे आणि तिची विवाहीत मुलगी सारीका चव्हाण हिच्यावर हल्ला करीत दागिने, रोकड चोरून नेल्याची घटना रविवारी रात्री मध्यरात्री अटाळी मानी येथे घडली होती. या प्रकरणातील दोघांपैकी एका अल्पवयीनला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सारीकाने मोठया आकाराचे सोन्याचे गंठन घातले होते. त्यावर या चोरटयांची नजर पडली होती आणि ते चोरण्याच्या उद्देशाने मायलेकींवर प्राणघातक हल्ला करीत दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहीती तपासात समोर आली आहे.
वत्सला चिकणे यांच्या शेजा-याने माघी गणेशाची स्थापना केली होती. त्यानिमित्ताने वत्सला यांची मुलगी सारिका चव्हाण ही देखील तीच्या दोन मुलांसोबत माहेरी आली होती. मध्यरात्री वत्सला आणि सारिका व तिची मुले घरात झोपले असताना चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात दोन जण घुसले. दरम्यान त्याचवेळेला वत्सला यांना जाग आल्याने त्या उठल्या. चोरटे त्यांच्या निदर्शनास पडताच त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी वत्सला यांच्या डोक्यावर चोरटय़ांनी कोणत्यातरी वस्तूने प्रहार केला. यावेळी झालेल्या आवाजाने मुलगी सारीका ही देखील जागी झाली. सारीकाने चोरटय़ांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटयांनी तीला ही मारहाण केली होती. चोरटयांच्या हल्ल्यात दोघी जखमी झाल्या होत्या. चोरटयांच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली होती.
सीसीटिव्हीत चोरटे कैद
ज्याठिकाणी चोरीची घटना घडली त्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. यात दोन मुल दुचाकीवरून जाताना आढळुन आली. त्याआधारे गुन्हयाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. दोघांपैकी एकाला पकडले आहे दुस-याचा शोध सुरू असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.