घरातील स्लॅबचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; गंभीर जखमी महिलेला मुंबईला हलविले
By अजित मांडके | Published: August 8, 2022 08:08 AM2022-08-08T08:08:09+5:302022-08-08T08:09:01+5:30
पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास घरातील स्लॅबचे प्लास्टर आशा आणि आयुष हे झोपी गेलेल्या ठिकाणीच पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: घरातील स्लॅबचे प्लास्टर पडून आशा मनोहर पाटील (४४) आणि आयुष (२०) हे मायलेक जखमी झाल्याची घटना सोमवारी पहाटे ०३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास बाळकुम पाडा नंबर-१ येथे घडली. त्या दोघांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असून आशा पाटील यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना मुंबईत उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तर आयुष याला किरकोळ दुखापत झाली आहे.
बाळकुम पाडा नंबर-१ येथील सखुबाई टॉवर जवळ,पाटील आळी मधील मनोहर रामकृष्ण पाटील यांच्या मालकीचे तळ अधिक एक मजली घर आहे. हे घर जवळपास १२ वर्ष जुने असून त्या घरात जखमी आशा आणि आयुष यांच्यासह अन्य दोघे असे चौघे झोपी गेले होते. पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास घरातील स्लॅबचे प्लास्टर आशा आणि आयुष हे झोपी गेलेल्या ठिकाणीच पडले. दोघांच्या अंगावर पडल्याने जखमी झाल्याचे पाहून त्या दोघांना तातडीने घरातील मंडळींनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. आशा या गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांना डॉक्टरांनी मुंबईतील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने त्यांना मुंबईत हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.