दोन मुलांसह मातेचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 06:27 PM2020-10-02T18:27:38+5:302020-10-02T18:27:44+5:30
केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, यासह विविध मागण्यांसाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
अंबाजोगाई : केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, यासह विविध मागण्यांसाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवार दि. २ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला.
लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड यांचा दि. १७ जुलै रोजी खून झाला. या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करत मयताची पत्नी मोहर लाड यांनी गृहमंत्र्याकडे आत्मदहनाची तक्रार केली होती. शुक्रवारी मोहर ऋषीकेश (वय १४) व शुभम (वय १२) या दोन मुलांसह लाडेवडगाव येथून सकाळी अंबाजोगाईला निघाले. मोहर यांनी दिलेल्या इशाऱ्याचा पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण चौकातच पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर साध्या वेशात पोलीस तैनात केले होते. परंतु सदरील महिलेने आपल्या दोन मुलांसह मुख्य रस्ता व चौक वगळुन मोरेवाडीतून एका बोळीतून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली.
प्रवेशद्वारावर तिघांच्या हातात असणार्या डिझेलने भरलेल्या बाटल्या अंगावर ओतुन घेत तिघांनीही एकच टाहो फोडला. तैनात असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत तात्काळ हस्तक्षेप करून तिघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा नोंदविला.