आईने आधी बहिणीला मारले, नंतर स्वतः केली आत्महत्या; बचावलेल्या मुलाने सांगितला घटनाक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:22 PM2020-08-07T17:22:39+5:302020-08-07T17:28:05+5:30
पतीच्या विरहात मुलीचा खून करून पत्नीची आत्महत्या;समीरने पोलिसांना सांगितला घटनाक्रम
औरंगाबाद : गणेशनगर परिसरातील स्वामी समर्थनगरात राहणाऱ्या समिना रुस्तुम शेख यांनी पतीच्या विरहामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी १७ वर्षीय आयेशाचा गळा दाबून खून केला आणि समीरला आत्महत्या करण्यास सांगितले. समीरने आत्महत्या करण्यासाठी दोन्ही हातांवर आणि गळ्यावर ब्लेडने वार करून घेतले. मात्र, या घटनेत तो वाचला.
पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, ४ जुलैच्या रात्री स्वामी नेमके काय घडले हे या घटनेत वाचलेल्या समीरने दिलेल्या जबाबानुसार ३१ जुलै रोजी कोविडमुळे वडिलांचे निधन झाले तेव्हापासून सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार आई समिना, जुळी बहीण आयेशा आणि समीरने केला होता. मात्र, ही बाब नातेवाईकांना समजल्यामुळे त्यांनी अनेकदा समिनाची समजूत काढली होती. आत्महत्या करणार नाही, असे ती नातेवाईकांना सांगायची; परंतु आत्महत्या करण्यावर सर्व ठाम होते. त्यांनी ४ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता नातेवाईकांसोबत जेवण केले. यानंतर तासभर टीव्ही पाहिल्यावर १२ वाजेच्या सुमारास झोपेच्या गोळ्या खाऊन तिघे मायलेक झोपले.
पहाटे ४ वाजेच्या सुमारास सर्वांना जाग आली. यानंतर त्यांनी स्वत:च्या हातावर ब्लेड मारून घेतल्या. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. समिनाने आयेशाला गळा दाबून मारले. यानंतर स्वत: बेडरूममधील पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन-चार मिनिटांनंतर गळफासाची साडी कापून समीरने त्याच्या आईला बेडवर आयेशाशेजारी ठेवले. यानंतर त्याने स्वत: आत्महत्या करण्यासाठी दोन्ही हातांवर आणि गळ्यावर ब्लेडने मारून घेतले. यात तो बेशुद्ध होऊन पडला. या घटनेत समीर वाचला.
मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन
या घटनेमुळे समीरला मानसिक धक्का बसला असेल. त्याच्या डोक्यात आत्महत्येचा विचार राहू नये, याकरिता त्याचे मानसोपचारतज्ज्ञाकडून समुपदेशन करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब मुळे यांनी दिली.