इंद्रा़यणी नदीमध्ये फेकून देत दोन मुलांचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 07:36 PM2018-12-19T19:36:25+5:302018-12-19T19:39:31+5:30
पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून दिल्याची घटना मे महिन्यात होती.
पुणे : पतीने आणलेले चिकन शिजवण्यास नकार दिल्यानंतर उद्भवलेल्या वादामधून पत्नीने दोन मुलांना पुलावरुन इंद्रायणी नदीमध्ये फेकून त्यांचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना मावळ तालुक्यातील आंबी येथे घडली होती. मुलांना फेकल्यानंतर तिनेही पाण्यामध्ये उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तिला स्थानिक महिलांनी वाचविले होते. ही घटना २२ मे २०१८ रोजी घडली होती. अतिरीक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी हा आदेश दिला. अवघ्या पाच महिन्यात हा निकाल लागला आहे.
शकुंतला अवधेश केवट (वय २८, रा. नानोली, ता. मावळ, पुणे, मुळ रा. महुंगज, मध्यप्रदेश) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अवधेश जगन्नाथ केवट यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या घटनेत अमन अवधेश केवट (वय ०४) व अमर अवधेश केवट (दीड वर्ष) यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ मे २०१८ रोजी अवधेश यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास जेवणासाठी चिकन आणले होते. त्यांनी शकुंतला हिला चिकन शिजवण्यास सांगितले. मात्र, तिने जेवण बनविण्यास नकार दिला होता. यावरुन त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी वाद शांत झाल्यावर त्यांना डबा करुन दिला.
मात्र, अवधेश कामावर गेल्यावर भांडणाच्या रागामधून तिने दोन्ही मुलांना सोबत घेऊन आंबी येथील पुल गाठला. आधी अमन याला नदीपात्रात फेकले. त्यानंतर अमर याला पाण्यात फेकून दिले. पाण्यात बुडाल्याने या दोघांचाही मृत्यू झाला. पाठोपाठ तिने नदीमध्ये उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहिलेल्या तीन ते चार जणांनी तिला पाण्यात उड्या घेऊन वाचविले होते.
याप्रकरणामध्ये सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी सहा साक्षीदार तपासले. घटनेच्यावेळी संबंधित ठिकाणी एक मासेमारी करणारा, आंघोळीसाठी नदीवर आलेला व नगरपालिकेचा कर्मचारी उपस्थित होता. दोन प्रत्यक्षदर्शींनी न्यायालयात नोंदविलेली साक्ष महत्वपूर्ण ठरली. बचाव पक्षाच्या वकीलांनी याप्रकरणात युक्तिवाद करताना, तिचे शरीरातील साखरेचे प्रमाण होऊन चक्कर आल्याने ती नदीपात्रात पडली होती. तसेच तिला वाचविण्याकरिता दोन्ही मुलांनी नदीत उडी मारल्याचा बचाव केला होता. मात्र, आरोपी महिला ही शारीरिक व मानसिकदृष्टया सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी केला.