पैशांच्या वादातून जावयाने सासूवर झाडली गोळी, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 07:59 AM2022-07-13T07:59:30+5:302022-07-13T07:59:58+5:30
पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला.
मुंबई : पैशांच्या वादातून तडीपार आरोपीने सासूवर गोळी झाडल्याचा प्रकार धारावीत समोर आला. तसेच, अटकेच्या भीतीने स्वतःवरही गोळी झाडून सायन रुग्णालयात दाखल करून घेतले आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी कायामुद्दीन मोईनउद्दीन सय्यदविरोधात विरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.
धारावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सय्यद हा रेकॉर्डवरचा आरोपी असून त्याला तडीपार करण्यात आले. त्याची दोन लग्ने झाली असून दुसरी पत्नी पीएमजीपी कॉलनी येथे राहते. त्याने पत्नीकडे ४० हजार ठेवण्यासाठी दिले, दोन दिवसाने ते पैसे घेण्यासाठी आला.
मात्र, पत्नीने खर्च केल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. याच, वादातून मंगळवारी सकाळी ७ वाजता त्याने पत्नीच्या घरी धाव घेतली. या वेळी तिचे दोन भाऊ आणि आई घरात होती. यादरम्यान कुटुंबीयांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. रागाने हा खाली आला. मात्र, चौथ्या मजल्यावरून सासूची बडबड सुरू होती. याच रागात जवळील पिस्तूलने त्याने सासूच्या दिशेने गोळी झाड़ून पळ काढला. यामध्ये सासू थोडक्यात बचावली. घटनेची माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरु केला.
- रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीचे लोकेशन सायन रुग्णालय दाखवताच पोलिसांनी तेथे चौकशी केली. तेव्हा, आरोपी जखमी अवस्थेत दिसून आला. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागल्याची माहिती मिळाली.
- चौकशीत स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आहे. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवत त्याच्या कक्षात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी दिली.