धक्कादायक... अनैतिक प्रेमसंबंधांना विरोध केल्याने आईची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 11:49 AM2022-09-22T11:49:53+5:302022-09-22T11:50:37+5:30
भिवंडीची घटना : प्रेयसीच्या मदतीने मुलाने आवळला गळा
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी : पतीपासून फारकत घेतलेल्या चुलत बहिणीसोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबंधांना विराेध केल्याने पाेटच्या मुलाने प्रेयसीच्या मदतीने आईची हत्या केल्याची घटना भिवंडीतील काल्हेर येथे मंगळवारी घडली आहे. अमरावती अंबिकाप्रसाद यादव (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नारपाेली पाेलिसांनी कृष्णा यादव (वय २९) आणि बबिता यादव (३०) यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
काल्हेर येथील मैत्री कॉम्प्लेक्स येथे अमरावती या पती व दोन मुलांसह राहत होत्या. त्यांच्या घरी पतीला साेडून आलेली पुतणी बबिता राहत हाेती. कृष्णा व बबिता यांच्यात प्रेमसंबंध जुळले. याबाबत अमरावती यांना कळताच त्यांनी हे अनैतिक असल्याचे सांगून त्यास विरोध केला. याचा राग मनात ठेवून कृष्णाने बबिता हिच्या मदतीने जन्मदात्या आईची बेडरूममध्ये पट्ट्याने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर कृष्णा याने १०० क्रमांकावर फोन करून आईची हत्या झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास दिली. त्यानंतर सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी पोहाेचले आणि तपास सुरू केला. चाैकशीत कृष्णा व बबिता यांनीच ही हत्या केल्याचे उघड झाल्याने त्यांना अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी जाधव करीत आहेत.
हाणामारीत मृत्यू झाल्याचा केला बनाव
पाेलीस तेथे पाेहाेचताच इमारतीच्या गेटजवळ आपला काही मित्रांसोबत वाद हाेऊन हाणामारी झाली. ते पाहताच आईने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून मला वाचविण्याचा प्रयत्न केला.
त्याच वेळी माझ्या डाेक्यात जाेरदार प्रहार झाल्याने मी बेशुद्ध झालाे. शुद्धीत आलाे तेव्हा मारहाणीत आईलाही जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला हाेता, असे कृष्णा याने सांगितले.
पोलिसांना संशय आल्याने त्याची कसून चौकशी केली असता बबिता हिच्या मदतीने आपणच आईची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.