तू मला का मारलं? हत्येच्या ४ महिन्यांनी स्वप्नात आला मुलगा; आईनं गुन्हा कबूल केला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:06 PM2023-09-05T16:06:50+5:302023-09-05T16:07:24+5:30
या घटनेच्या ४ महिन्यानंतर महिलेला वाईट स्वप्न येऊ लागली. त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला.
मध्य प्रदेशातील ग्वालेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. त्याठिकाणी एका महिलेने आईच्या नात्याला काळीमा फासला आहे. माता न तू वैरिणी या म्हणीचा प्रत्यय इथं येतो. आईने स्वत:च्या मुलाला छतावरून ढकलून देत त्याची हत्या केली. या महिलेचे शेजाऱ्यासोबत अनैतिक संबंध होते. जेव्हा महिला शेजारच्यासोबत नको त्या अवस्थेत होती. तेव्हा तिचा ३ वर्षीय मुलगा आला. आता मुलगा वडिलांना सर्वकाही सांगेल या भीतीने आईने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, एका हेड कॉन्स्टेबलने दुकानाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही निमंत्रण पाठवले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी राहणारा व्यक्ती दोघेही सर्वांची नजर चुकवत छतावर गेले होते. त्याठिकाणी दोघेही रोमान्स करत होते. तेव्हा महिलेचा ३ वर्षाचा मुलगा तिथे पोहचला. जेव्हा महिलेने मुलाला तिथे पाहिले ती घाबरली. आपल्या कृत्याचा पर्दाफाश होणार या भीतीने आईने क्रूर कृत्य केले. तिने स्वत:च्या पोटच्या मुलालाच छतावर खाली ढकलून दिले.
हा चिमुकला छतावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. एक दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार झाले. परंतु तो वाचू शकला नाही. या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. मुलगा छतावरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला असे त्यांना वाटत होते. हा एक अपघात असल्याचे सर्वांना वाटले. ही घटना २८ एप्रिल रोजी घडली. २९ एप्रिलला मुलाचा मृत्यू झाला होता.
या घटनेच्या ४ महिन्यानंतर महिलेला वाईट स्वप्न येऊ लागली. त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला. अनेक रात्री अशाच गेल्या. स्वप्नातून तिचा मृत मुलगा पाठलाग सोडत नव्हता. तू मला का मारले हा प्रश्न महिलेच्या मनात बिंबत होता. अखेर महिलेने तिचा गुन्हा पतीसमोर कबुल केला. पत्नीकडून पतीला जे काही सांगण्यात आले त्याने त्याला धक्का बसला. त्यानंतर पतीने महिलेचं पूर्ण कथन व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर पत्नीने पोलिसांसमोर सरेंडर केले. सध्या पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.