बायकोला घरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या; धारदार सुऱ्याने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 08:23 AM2020-07-18T08:23:40+5:302020-07-18T08:26:51+5:30
हे प्रकरण १६ जुलैच्या रात्रीचं आहे. मोहन गार्डन पोलीस ठाण्यात आरोपी रवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी दिल्ली – क्षुल्लक कारणावरुन जावयाने सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बायकोला घरी पाठवत नसल्याच्या रागातून नवऱ्याने सासूवर चाकूने वार करत तिची हत्या केली.जावयाचं ते रौद्र रुप पाहून आसपासच्या लोकांनीही आरोपीला अडवण्याची हिंमत केली नाही. महिलेच्या मुलीने, मुलाने आणि नवऱ्याने वाचवण्याचे प्रयत्न केले असता त्यांनाही आरोपीने जखमी केलं.
हे प्रकरण १६ जुलैच्या रात्रीचं आहे. मोहन गार्डन पोलीस ठाण्यात आरोपी रवीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार घटना घडल्यानंतर काही क्षणात पोलीस घटनास्थळी पोहचले होते, घटनास्थळापासून काही अंतरावरच पोलीस बीट चौकी होती. तपासात जावई रवीने सासूवर बर्फ तोडणाऱ्या चाकूने अनेक वार केले होते अशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ जावयाला अटक करण्यात आली. रवी(३८) ने त्याची पत्नी, मुले आणि सासऱ्यालाही जखमी केले आहे. पोलिसांनी जखमींना जवळच्या तारक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
डॉक्टरांनी सासू शशिबाला(६२) यांना मृत घोषित केले आहे. तर अन्य ३ जखमींवर डीडीयू रुग्णालयात उपचारासाठी हलवलं असल्याची माहिती दिली. आरोपी रवीवर मादक पदार्थांचे सेवन, खंडणी, हत्येचा प्रयत्न आणि बलात्कार यासारखे गुन्हे यापूर्वीही नोंद आहेत. तो काही काळ तुरूंगातही होता. २०१९ मध्ये पोक्सो आणि बलात्कार प्रकरणात त्याने ९ महिने तुरूंगात घालविला. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी, तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याला कळले की त्याची पत्नी आणि मुलगी माहेरी गेली आहे. या सर्व गोष्टीमागे त्याची सासूच जबाबदार असल्याचे त्याला वाटले. तेव्हापासून सासूला वाटेतून काढण्याचा त्याचा डाव होता असं पोलीस तपासात उघड झालं आहे.
चार दिवसांपूर्वी दुकानातून त्याने बर्फ तोडणारा चाकू खरेदी केला. १६ जुलै रोजी रात्री सासू तिच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी घराबाहेर आली, त्यावेळी दबा धरुन बसलेल्या आरोपी रवीला हत्या करण्याची संधी मिळाली. घटनेवेळी त्याची पत्नी आणि मुलगा काही अंतरावर उभे होते. त्यावेळी अचानक रवीने सासूवर चाकूने वार करत जागेवरच तिची हत्या केली, यावेळी रवीला अडवण्यासाठी आलेल्या ३ जणांवरही रवीने चाकूने प्रहार केला. यात तिघेही जखमी झालेत.