माता न तू वैरिणी! स्वत:च्या दोन मुलांची केली हत्या, महिलेला कोर्टाने दिली जन्मठेपेची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 06:34 PM2023-08-01T18:34:47+5:302023-08-01T18:38:38+5:30
महिलेला हत्येचा पश्चात्ताप नाही, कोर्टाचे निरीक्षण.. नक्की प्रकरण काय?
Mother Killed 2 children: लोरी व्हॅलो डेबेल या महिलेला तिच्या दोन मुलांची हत्या आणि तिच्या पतीच्या पूर्वपत्नीच्या हत्येचा कट रचल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. चार वर्षांपूर्वी हे प्रकरण चर्चेत होते. अनेकांनी लोरीला क्रूरतेचे उदाहरण असेही संबोधले होते. मे महिन्यात, ज्युरीने तिला तिन्ही आरोपांमध्ये दोषी ठरवले. अमेरिकन वकिलांच्या म्हणण्यानुसार, 50 वर्षीय महिलेला सर्वनाश करण्याच्या धार्मिक शिकवणीचे वेड लागले आणि तिचा विश्वास होता की असे केल्याने तिची मुले स्वर्गात जाऊ शकतात. म्हणून तिने त्यांची हत्या केली पाहिजे असा तिचा विचार झाला. लोरीचा असा विश्वास होता की तिची मुले झोम्बी आहेत आणि ती स्वत: त्या मुलांचा सर्वनाश करण्यासाठी पाठवलेली देवी आहे.
सोमवारी (३१ जुलै) एका न्यायाधीशाने लोरीला तिच्या मुलांच्या हत्येसाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिने १६ वर्षीय टायली रायन आणि ७ वर्षीय जोशुआ 'जेजे' व्हॅलो आणि टॅमी डेबेल (पती चाड डेबेलचा पहिली पत्नी) यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षा सुनावताना, न्यायाधीश बॉयस म्हणाले की, 'सर्वात गंभीर आरोपां'साठी ही महिला दोषी असूनही तिला कोणताही पश्चात्ताप नाही. टॅमी डेबेलच्या हत्येचा कट रचल्याबद्दल तू दोषी आहेस. ज्युरीने सबळ पुराव्यासह तुला दोषी ठरवले आहे. तरीही तू आजही न्यायालयात म्हणते आहेस की तू हे केले नाहीस. हत्या हा सर्वात गंभीर गुन्हा आहे आणि सर्वात अकल्पनीय प्रकार म्हणजे आईने स्वतःच्या मुलांची हत्या करणे, आणि तुम्ही तेच केले आहे. अशा वेळी शिक्षा देणं योग्यच आहे.
लोरीने हत्येचा इन्कार केला आणि धार्मिक श्रद्धेचा हवाला दिला
सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लोरीने आपल्या मुलांची हत्या केल्याचा इन्कार केला आणि धार्मिक ग्रंथ आणि श्रद्धांचा हवाला देऊन आपल्या कृतीचे समर्थन करत राहिली. लॉरीने त्यांच्या मृत्यूनंतर देवाशी तसेच तिच्या मुलांशी बोलल्याचा दावा केला. ती म्हणाली की ते स्वर्गात 'आनंदी आणि खूप व्यस्त' आहेत असेही तिने दावा केला.
यावर न्यायाधीशांनी उत्तर दिले, 'कोणत्याही धर्माच्या देवाला असे व्हावे असे मला वाटत नाही. दरम्यान ही मुले सप्टेंबर 2019 मध्ये बेपत्ता झाली होती.