आईनेच आवळला गतिमंद लेकीचा गळा; अंधेरीतील हृदयद्रावक घटना, शुश्रूषेला कंटाळून पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 10:56 AM2022-06-17T10:56:20+5:302022-06-17T10:58:23+5:30
लेकीच्या गतिमंदपणाला कंटाळून अंधेरीत एका महिलेने १८ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली.
मुंबई :
लेकीच्या गतिमंदपणाला कंटाळून अंधेरीत एका महिलेने १८ वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता तिने आत्महत्या केल्याचा बनावही रचला. मात्र शवविच्छेदन अहवालात हा घातपात असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी गुरुवारी आईला अटक केली.
अंधेरीच्या वीर हनुमान इमारतीत चौथ्या मजल्यावर सुरेश पत्याने हे पत्नी श्रद्धा आणि मुलांसोबत राहतात. पोलीस नियंत्रण कक्षावर १५ जून रोजी एक फोन आला, ज्यात १९ वर्षांच्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संताजी घोरपडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मुलगी चटईवर निपचित पडली होती. तिच्या शेजारी तिचे आई-वडील बसले होते. मृत मुलीचे नाव वैष्णवी असून ती मोठी मुलगी आहे.
तिने कापडी पट्टीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे श्रद्धाने पोलिसांना सांगितले. तिला उपचारासाठी पोलिसांनी जुहूच्या कूपर रुग्णालयात हलविले. तेव्हा डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचसोबत तिच्या गळ्यावरील निशाणाबाबत पोलिसांनी कूपरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गतिमंद व्यक्ती अशा प्रकारे गळफास घेऊन आत्महत्या करण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
चौकशीदरम्यान वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आला. तेव्हा त्यांच्याकडून याबाबतची माहिती परिमंडळ १० चे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांना देण्यात आली.
चौकशीत कापडी पट्टीने गळा आवळल्याची कबुली
- रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली घोरपडे व पथकाने वैष्णवीच्या मृत्यूच्या वेळी हजर असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे तिची आई श्रद्धा हिच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला तिने काही सांगितले नाही. मात्र नंतर लेकीच्या आजारपणामुळे तिची करावी लागणारी शुश्रूषा याला कंटाळून तिनेच लेकीचा गळा कापडी पट्टीने आवळल्याचे पोलिसांकडे कबूल केले. त्यानुसार तिच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून १६ जूनला तिला अटक करण्यात आल्याची माहिती घोरपडे यांनी दिली. या घटनेमुळे अंधेरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.