थंडी, रात्र आणि जंगल... दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या महिलेचं 3 मुलांसोबत धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 04:42 PM2024-01-18T16:42:07+5:302024-01-18T16:50:53+5:30
पोलिसांना रात्रीच्या वेळी जंगलाजवळ थंडीत 3 लहान मुलं कुडकुडताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता मुलांनी वडिलांचं नाव आणि घरचा पत्ता सांगितला.
उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती पोलिसांना रात्रीच्या वेळी जंगलाजवळ थंडीत 3 लहान मुलं कुडकुडताना दिसली. पोलिसांनी चौकशी केली असता मुलांनी वडिलांचं नाव आणि घरचा पत्ता सांगितला. यानंतर पोलिसांनी त्यांना सर्वप्रथम पोलीस ठाण्यात नेलं, उबदार कपडे आणि खाण्यासाठी काही वस्तू दिल्या. त्यानंतर त्या मुलांना घरी नेण्यात आलं. याच दरम्यान मुलांनी आईबद्दल जे सांगितलं ते ऐकून पोलीसही हैराण झाले.
श्रावस्ती जिल्ह्यातील भिनगा कोतवाली भागातील एका गावातील एक महिला 3 मुलांसह तिच्याच दिरासोबत 6 महिन्यांपूर्वी पळून गेली होती. ती लखनौमध्ये तिची मुलं आणि प्रियकरासह राहत होती. अचानक एका रात्री ही महिला प्रियकरासह श्रावस्ती येथे पोहोचली. येथे तिने आपल्या तीन मुलांना जंगलाजवळ सोडलं. यानंतर ती तिच्या प्रियकरासह फरार झाली.
पोलीस गस्त घालत असताना त्याच मार्गावरून गेले. तेव्हा थंडीत कुडकुडत असलेली तीन मुलं पोलिसांना दिसली. पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली आणि त्यांना आपल्यासोबत पोलीस ठाण्यात नेलं. तेथे त्यांना उबदार कपडे, बिस्किटं आणि फळं देण्यात आली. चौकशीत मुलांनी सांगितलं की, आई आणि काका लखनौमध्ये राहतात. त्यांनी रात्री बसने आम्हाला आणलं आणि जंगलाजवळ सोडलं. यासोबतच मुलांनी घराचा पत्ता सांगितला.
पोलिसांनी त्यानंतर मुलांना आजी-आजोबांच्या ताब्यात दिलं. तसेच संबंधित महिला आणि तिच्या प्रियकरावर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या कामासाठी पोलीस पथकाला बक्षीस देण्याची घोषणा एसपींनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.