माय-लेकाची विष पिऊन आत्महत्या, डुडुळगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 01:32 AM2018-12-28T01:32:21+5:302018-12-28T01:32:32+5:30
डुडुळगाव येथे वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले.
पिंपरी : डुडुळगाव येथे वन विभागाच्या हद्दीत बुधवारी सकाळी दोन मृतदेह आढळून आले. एक पुरुष, एक महिला असे मृतदेह असल्याने नेमके मृतदेह कोणाचे, त्यांचे दोघांचे नाते काय हे अनभिज्ञ होते. ‘मी आणि माझी आई स्वखुशीने आत्महत्या करीत आहोत, याबद्दल कोणाला दोषी धरू नये’ अशा आशयाची तेथे एक चिठ्ठी आढळून आली. तसेच कीटकनाशक विषारी द्रव्याची बाटली तेथे पडली होती. त्यामुळे मायलेकरांचे मृतदेह असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले असले, तरी त्यांची ओळख पटविणारा दुसरा कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. या अज्ञात मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी दिघी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
डुडुळगाव येथील वन विभागाच्या हद्दीत झुडपात सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह पडले असल्याची माहिती नागरिकाने पोलिसांना कळविली. दिघी ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना तेथे कीटकनाशकाची बाटली आढळून आली. दोन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. बाजूला चिठ्ठी पडलेली दिसून आली. त्यामुळे चिठ्ठीच्या आधारे त्यांचा नातेसंबंध लक्षात आला. त्यांची ओळख पटेल अशी कोणतीच कागदपत्रे पोलिसांना मिळाली नाहीत. या बाबत तपास सुरू आहे. याबाबत कोणाला माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, शहर परिसरात आत्महत्येच्या घटनामध्यो मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.