पुन्हा मुलगी झाली म्हणून नवजात अर्भकाला आईने फेकले १७ व्या मजल्यावरून
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2019 10:36 PM2019-12-05T22:36:54+5:302019-12-05T22:38:33+5:30
अधिक तपास कांदिवली पोलीस करीत आहेत.
मुंबई - पूर्वीच दोन मुली जन्माला आल्या त्यात तिसरीही मुलगी जन्माला येताच आईनेच इमारतीच्या १७ व्या माळ्यावरून नवजात अर्भकाला फेकून दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करून पतीला अटक करण्यात आली. तर आईला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक तपास कांदिवली पोलीस करीत आहेत.
गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने नवजात अर्भक खाली फेकल्याच्या घटनेचा उलगडा झाला. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत जय भारत एसआरए सोसायटी अभिलाख नगर, कांदिवली पश्चिम येथे १७ व्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या महिलेची आजच गुरुवारी दुपारी प्रसूती घरीच झाली. मात्र, मुलगीच जन्माला आलेली पाहून महिलेने बाथरूमची काच काढून इमारतीच्या खाली नवजात अर्भक फेकले. ते जमिनीवर पडताच आवाज झाला. हा आवाज इमारतीच्या सुरक्षारक्षकाने एकाला आणि तपासणी केल्यानंतर इमारतीतून नवजात अर्भक खाली फेकल्याची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. घटनास्थळी त्वरित ठाणे अंमलदार संदीप पाटील पोहचले. त्यांनी अर्भकाला पंचनामा करून ताब्यात घेतले. त्याच्या शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, नवजात अर्भक कुठल्या माळ्यावरून खाली टाकले याबाबत पोलीस संभ्रमात होते. त्यानुसार पोलिसांनी सोबत आलेल्या महिला पोलिसांना घेऊन इमारतीचा प्रत्येक मजला तपासण्याचे ठरविले आणि तपास सुरु केला. जय भारत एसआरए सोसायटीची बी विंग ही २३ मजल्याची इमारत आहे. पोलीस पथकाने मोठी कसरत करीत प्रत्येक मजला तपासात १७ व्या माळ्यावर आल्यानंतर महिला पोलिसांनी घराची तपासणी केल्यानंतर रक्ताचे काही ठिकाणी डाग आढळले. या महिलेकडे विचारणा केल्यानंतर तिने अर्भकाला खाली फेकल्याची कबुली दिली. पती तिला खर्चासाठी पैसे देत नव्हता. अगोदरच दोन मुली आहेत. त्यात तिसरीही मुलगीच झाल्याने तिला जन्मताच खाली फेकून दिल्याची कबुली दिली. घरीच प्रसूती झाल्याने अस्वस्थ महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर महिलेच्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून कांदिवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.