मुलीच्या रडण्यामुळे मिळाले आईला जीवदान; गळफास घेतलेल्या महिलेचे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 22:44 IST2020-06-19T22:37:46+5:302020-06-19T22:44:10+5:30
यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी पोलिसांनी ओढणीचा फास कापून महिलेला खाली उतरवले. तर अग्निशमन दलाचे कर्मचारी राकेश सरोदे यांनी त्या महिलेला सीपीआर दिला असता तिच्या शरीराची हालचाल जाणवली.

मुलीच्या रडण्यामुळे मिळाले आईला जीवदान; गळफास घेतलेल्या महिलेचे वाचले प्राण
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : - बंद घरातून मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याच्या तक्रारीमुळे महिलेला जीवदान मिळाले आहे. तक्रारीवरून पोलीस व अग्निशमन दल तात्काळ त्याठिकाणी गेले असता, महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. परंतु प्रसंग सावधानता दाखवत बचाव दलाने महिलेला सीपीआर देऊन तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने प्राण वाचले आहेत.
उलवे सेक्टर 5 येथे शुक्रवारी रात्री 9.45 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याठिकाणच्या इमारतीमधील बंद घरातून लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याची तक्रार पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये मिळाली होती. हा संदेश एनआरआय पोलिसठाण्याचे बिट मार्शल किरण स्वार व पांडुरंग कवठे यांना मिळताच त्यांनी अग्निशमन दलाला कळवले. काही वेळातच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस त्याठिकाणी पोचले असता त्यांनी बंद घराचा दरवाजा तोडला. यावेळी आतमध्ये असलेल्या चार वर्षाची मुलीने बंद बेडरूमच्या दिशेने इशारा केला. त्यामुळे बेडरूमचा दरवाजा देखील तोडला असता आतमध्ये सिलिंगच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेली महिला आढळून आली.
यावेळी क्षणाचाही विलंब न लावता पोलिसांनी पोलिसांनी ओढणीचा फास कापून महिलेला खाली उतरवले. तर अग्निशमन दलाचे कर्मचारी राकेश सरोदे यांनी त्या महिलेला सीपीआर दिला असता तिच्या शरीराची हालचाल जाणवली. यावरून त्यांच्यात प्राण शिल्लक असल्याची खात्री होताच तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे सदर महिलेचे प्राण वाचले असल्याचे एनआरआय पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तन्वीर शेख यांनी सांगितले. घटनेवेळी महिला व लहान मुलगी दोघीच घरात होत्या. याप्रकरणी एनआरआय पोलीस अधिक तपास करत आहेत.