मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवू न शकल्याने आईची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 08:13 PM2019-08-17T20:13:04+5:302019-08-17T20:13:14+5:30

नागरिकांमध्ये हळहळ : रविनगरातील हृदयदायक घटना

Mother's suicide due to failing to pay money for her children's education | मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवू न शकल्याने आईची आत्महत्या

मुलांच्या शिक्षणासाठी पैसे पुरवू न शकल्याने आईची आत्महत्या

Next

अमरावती : पुण्याला इंजिनीअरिंंगचे शिक्षण घेणाºया मुला-मुलीला पैसे पुरवू न शकल्याची खंत मनाशी बाळगून एका आईने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही हृदयदायक घटना शुक्रवारी रविननगर परिसरात उघडकीस आली. नीलिमा मोहन कडू (४५, रा. रविननगर) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 


पोलीस सूत्रानुसार, मोहन कडू हे जयस्तंभ चौकातील एका पेट्रोलपंपावर कार्यरत असून, तेथील मिळकतीवर ते कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवितात. कडू दाम्पत्याला एक मुलगा व मुलगी असून, हलाखीची परिस्थिती असतानाही आई-वडिलांनी मुलांना इंजिनीअरिंंगच्या शिक्षणासाठी पुण्याला पाठविले. पेट्रोल पंपावर मिळणाºया वेतनावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह भागविणे फार कठीण होत असतानाही कडू दाम्पत्य आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करीत होते. काही दिवसांपासून मुलगा व मुलगी शिक्षणासाठी आई-वडिलांना पैसे मागत होते. मात्र, आर्थिक चणचण असल्यामुळे ते पैसै पाठवू शकले नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याची खंत कडू दाम्पत्याला होती. पैसे जुळविताना नीलिमा कडू या मानसिक तणावात होत्या. अखेर हा तणाव सहन न झाल्याने नीलिमा यांनी शुक्रवारी गळफास घेतला.

घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. नीलिमा कडू यांची दोन्ही मुले पुण्यावरून शनिवारी परतल्यानंतर नीलिमा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेविषयी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आर्थिक विवंचनेमुळे मुलांना पैसे पाठवू न शकल्यामुळे आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Mother's suicide due to failing to pay money for her children's education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.