माता न तू वैरीण...सात वर्षाच्या मुलीला दिले सराट्याने चटके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 06:38 PM2018-09-28T18:38:43+5:302018-09-28T18:45:06+5:30
निर्दयी मातेने तिच्या पोटच्या सात वर्षीय मुलीला पार्श्वभागावर तापलेल्या सराटयाने चटके दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
अकोला: जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवसेना वसाहत येथील रहिवासी एका निर्दयी मातेने तिच्या सात वर्षाच्या मुलीला पार्श्वभागावर तापलेल्या सराट्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. आईला न सांगता शेजारी राहत असलेल्या आजी-आजोबांकडे ही मुलगी जात असल्यामुळे तिच्या मातेने हा प्रकार केल्याची माहिती जुने शहर पोलिसांनी दिली.
शिवसेना वसाहत येथील रहिवासी नीता मोहन आपोतीकर (वय ३८) हिला रोहिणी नावाची सात वर्षाची मुलगी आहे. रोहिणी तिच्या आईला न सांगता बाजूलाच राहत असलेल्या आजी-आजोबांकडे राहावयास जात होती, हा प्रकार मुलीची आई नीताला न पटल्यामुळे तिने मुलीला शुक्रवारी गरम सराटा करून चटके दिले. यामध्ये मुलीचा पार्श्वभाग गंभीररीत्या जळाला आहे. नीता आपोतीकर हिने पोटच्या मुलीला चटके दिल्याची माहिती शेजाऱ्यांना समजल्यावर त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळविला.
सदर घटनेची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने जुने शहर पोलिसांना सोबत घेऊन मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी मुलीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्यानंतर मुलीची आई नीता मोहन आपोतीकर हिच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३२४ आणि जस्टीस जुवेनाइल अॅक्टच्या कलम ७५ नुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
ठाणेदारांनी विकत घेतले टीटीचे इंजेक्शन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात गंभीर जळालेल्या चिमुकलीला उपचारासाठी व वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यानंतर रुग्णालयात मुलीवर उपचारासाठी आवश्यक असलेले टीटीचे इंजेक्शनच उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यामुळे ठाणेदार अन्वर शेख यांनी शहरातील मेडिकल दुकानामध्ये जाऊन १८ टीटीचे इंजेक्शन खरेदी केले. त्यानंतर सदर इंजेक्शन रुग्णालय प्रशासनाकडे दिले.
मुलीने बयान बदलविले
सात वर्षे चिमुकली रोहिणी हिला पोलिसांनी विचारल्यावर तिने सुरुवातीला आईनेच चटके दिल्याची माहिती पोलिसांना दिली; मात्र वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर काही वेळातच चुलीवर पडल्याचे तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र त्यानंतरही पोलिसांनी तिची आई नीता हिची चौकशी सुरू केली आहे, मुलीने बयान बदल्यामुळे पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.