ताथवडे येथे अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:52 IST2019-07-12T17:52:07+5:302019-07-12T17:52:48+5:30
मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक चालक त्याच्याकडील मोटारसायकल बेदरकारपणे चालवित होता..

ताथवडे येथे अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
पिंपरी : मोटारसायकलची धडक बसल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. ताथवडे येथील पवारवस्ती येथे बुधवारी (दि. १०) दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम दत्तू इल्लाळे (वय ४०, रा. पवारवस्ती, ताथवडे) असे मृत्यू झालेल्या मोटारसायकलस्वाराचे नाव आहे. मृत्यू झालेल्या राम इल्लाळे यांचा मुलगा आकाश राम इल्लाळे (वय १९, रा. पवारवस्ती, ताथवडे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोटारसायकलच्या अज्ञात चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
राम इल्लाळे बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक चालक त्याच्याकडील मोटारसायकल बेदरकारपणे चालवित होता. त्या अज्ञात चालकाने इल्लाळ यांच्या मोटारसायकलला समोरून धडक दिली. त्यामुळे इल्लाळे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.