मोटार सायकल चोरटा सीसीटीव्हीमुळे पोलिसांच्या जाळ्य़ात, १६ लाखांच्या १३ मोटार सायकल हस्तगत
By मुरलीधर भवार | Published: January 24, 2023 05:46 PM2023-01-24T17:46:48+5:302023-01-24T17:47:42+5:30
शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे.
कल्याण - कल्याण आणि डोंबिवली परिसरात उभ्या करुन ठेवलेल्या मोटार सायकल चोरणाऱ्या चोरटय़ास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव शुभम भास्कर पवार (१९) असे आहे. तो भिवंडीतील राजनोली परिसरात राहत होता. त्याने चोरी केलेल्या १६ लाख रुपये किंमतीच्या १३ मोटार सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
शुभम पवार हा मूळचा लातूर येथील निलंगा परिसरात राहणारा आहे. तो भिवंडी येथील राजनोली परिसरात राहत होता. तो कल्याण आणि डोंबिवली स्टेशन परिसरातील मोटार सायकल हेरायचा. ज्या मोटार सायकल लॉक केलेल्या नसायच्या त्याच मोटार सायकल चोरी करुन तो पसार व्हायचा. त्याने आत्तापर्यंत १३ मोटार सायकल चोरी केल्या होत्या. त्यात चार बुलेट होत्या. ज्या महागडय़ा आहेत. या चोरीच्या गाडय़ा तो अन्य ठिकाणी जाऊन विकायचा.
महात्मा फुले, विष्णूनगर, डोंबिवली रामनगर पोलिस ठाण्यात मोटार सायकलचे गुन्हे दाखल होते. या प्रकरणात कल्याण गुन्हे अन्वेषण शाखा तपास करीत होती. पोलिसांनी मोटार सायकल चोरीच्या प्रकरणात सीसीटीव्ही फूटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा कल्याण स्टेशन परिसरातील एक सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये शुभम हा मोटार सायकल चोरी करुन नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी शुभमला भिवंडी राजनोली येथून अटक केली आहे. कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे किशोर शिरसाट यांच्या पथकानेही शुभमला अटक केली आहे. ही माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी दिली आहे.