भिवंडीत मोटार सायकल चोरट्यांना अटक; १६ दुचाकी जप्त
By नितीन पंडित | Published: August 22, 2023 06:01 PM2023-08-22T18:01:57+5:302023-08-22T18:02:17+5:30
या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
नितीन पंडित
भिवंडी: शांतीनगर पोलिसांनी चार मोटरसायकल चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख रुपये किमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती भिवंडी सहायक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. मुस्तकीम उर्फ आसीफ मोहमद अमीन अन्सारी वय २५,रा.संजयनगर, भिवंडी,जावेद उर्फ जाहिद जाबीर शेख वय ३९,रा.नविबस्ती,पडघा बोरीवली, हसनैन जाफर हुसेन सैयद वय २१ रा. कौसा मुंब्रा व अतिक उर्फ अल्ताफ मुनाफ शेख वय २३,रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा जि.जळगाव असे दुचाकी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार दुचाकी चोरट्यांची नावे आहेत.
सुरुवातीला शांतीनगर पोलिसांनी मुस्तकीम यास ताब्यात घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याने त्याचे साथीदार जावेद उर्फ जाहिद व हसनैन यांच्या सोबत दुचाकी चोरी करून ते पाचोरा जळगाव येथील अतिक उर्फ अल्ताफ याच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण भागात विक्री करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.त्यानंतर पोलिसांनी जळगाव येथून एकूण ११ मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत.त्यामधून शांतीनगर पोलीस ठाणे येथील ४,कोनगाव पोलीस ठाणे येथील ५,नारपोली पोलीस ठाणे येथील १,पडघा पोलिस ठाणे १ अशा ३ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या दुचाकी चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले असून एका दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर मागील आठवड्यात शांतीनगर हद्दीतून मोहम्मद असिफ हबीब शेख ऊर्फ सज्जो वय २०,रा. गायत्री नगर यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून १ लाख ६० हजार रुपये किमतीच्या ५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
हि कामगिरी शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर,पोलीस निरीक्षक निलेश बडाख,विक्रम मोहीते यांच्या नेतृत्वा खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे,पोलिस हवालदार महेश चौधरी, रिजवान सैयद,दिलीप शिंदे,पोलीस नाईक किरण जाधव,श्रीकांत पाटील,पोलिस शिपाई रविंद्र पाटील,नरसिंह क्षीरसागर,तौफीक शिकलगार या तपास पथकाने केली आहे.