अपहरण करत चालत्या गाडीत लुटले, माहिमच्या रस्त्यावर सव्वा तासाचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 03:19 AM2018-11-23T03:19:06+5:302018-11-23T03:19:18+5:30

पासपोर्ट बनविण्याचे काम केले नाही म्हणून ४२ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला चालत्या गाडीत मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी माहिममध्ये उघडकीस आली.

moving vehicle hijacked | अपहरण करत चालत्या गाडीत लुटले, माहिमच्या रस्त्यावर सव्वा तासाचा थरार

अपहरण करत चालत्या गाडीत लुटले, माहिमच्या रस्त्यावर सव्वा तासाचा थरार

Next

मुंबई : पासपोर्ट बनविण्याचे काम केले नाही म्हणून ४२ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करत त्याला चालत्या गाडीत मारहाण करत लुटल्याची घटना बुधवारी माहिममध्ये उघडकीस आली. सव्वा तास माहिमच्या रस्त्यावर हा लुटीचा थरार रंगला होता. या प्रकरणी माहिम पोलिसांनी बाबर खानसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव मोतीलाल नगर परिसरात रोशन डिसोझा (४२) हे राहण्यास आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून पासपोर्ट बनविण्याचे काम करतात. त्याच दरम्यान त्यांची ओळख बाबर खान याच्यासोबत झाली. बाबरने त्यांच्याकडे ४ मुलांना परदेशात नोकरीसाठी पाठविले. त्यांचे पासपोर्ट डिसोझा यांनीच बनवून दिले होते. मात्र तेथे काम न पटल्यामुळे तरुण मुंबईत परतले. डिसोझा यांनी बाबरसोबत काम करणे सोडले. यावरून बाबर आणि डिसोझा यांच्यात वाद सुरू झाला. बुधवारी दुपारी २ वाजता डिसोझा नेहमीप्रमाणे गोरेगावमध्ये चर्चमध्ये गेले आणि पावणेतीनच्या सुमारास तेथून बाहेर पडले.
याच दरम्यान एकाने त्यांना फोन करून परदेशात नोकरीनिमित्ताने जायचे असल्याबाबत सांगितले. तेव्हा, डिसोझा यांनी नकार दिला. मात्र संबंधित व्यक्तीने त्यांना भेटण्यास बोलावले. पार्क केलेल्या एम.एच. ०३ - ०८४८ या गाडीकडे येण्यास सांगितले. ते गाडीकडे जाताच, पाठीमागून एकाने त्यांना गाडीत ढकलले. दरवाजा बंद करून गाडी माहिम जंक्शन येथून जुहूच्या दिशेने निघाली. पुढे काही अंतरावर बाबरही गाडीत चढला.
गाडीत चौघांनी मिळून त्यांना मारहाण सुरू केली. ते मदतीसाठी ओरडत असताना त्यांचे तोंड दाबण्यात आले. तब्बल सव्वा तास गाडी माहिमच्या रस्त्यांवर फिरत होती. डिसोझा यांच्या अंगावरील दागिने काढून घेण्यात आले. तसेच पैशांसह डेबिट कार्डही स्वत:कडे घेतले. धमकावून डेबिट कार्डचा पिन क्रमांकही मिळवला.
त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास त्यांना पुन्हा चर्च परिसरातच सोडून चौकडीने पळ काढला. त्यांनी मित्राला घडलेला प्रकार सांगताच, त्याने घटनास्थळी धाव घेत डिसोझा यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखलकेली. घटना माहिम परिसरात घडल्याने गुन्हा दाखल करून तपास माहिम पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. या घटनेचा माहिम पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: moving vehicle hijacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.