बनावट पासबुक आणि एफडी, लोकांनी जमा केलेली आयुष्यभराची कमाई पोस्टमास्तरनं IPL च्या सट्ट्यात उडवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:27 PM2022-05-25T12:27:25+5:302022-05-25T12:27:56+5:30
आता पैशांसाठी लोक मारतायत फेऱ्या, कार्यालयाकडूनही उत्तर मिळत नसल्याची व्यक्त केली खंत.
भोपाळ : आयपीएलच्या सामन्यांमध्ये सट्टा लावल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. त्यात अनेकांना अटकही करण्यात आली. परंतु सागर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील बीना येथील सब पोस्ट ऑफिसच्या एका पोस्ट मास्तरनं लोकांनी मेहनतीनं जमा केलेली रक्कम आयपीएलच्या सट्ट्यात उडवली. आता ग्राहक आपली जमा रक्कम मिळवण्यासाठी पासबुक घेऊन पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारत आहेत. पोस्ट मास्तरनं अनेक ग्राहकांकडून घेतलेल्या लाखो रुपयांसाठी बनावट पासबुक आणि एफडी तयार केली होती. जेव्हा लोक पैसे काढण्यासाठी पोहोचले तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. यापैकी काही ग्राहकांनी लग्नासाठी पैसे जमा केले होते. पोलिसांनी पोस्ट मास्तर विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.
बीना सब पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर विशाल अहिरवार याला २० मे रोजी जीआरपीनं अटक केलं. सध्या त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात त्यानं आयपीएलच्या सट्ट्यावर एक कोटीपेक्षा अधिक रक्कम उडवली असल्याचं कबुल केलं आहे.
पैशांसाठी लोकांच्या फेऱ्या
आता आपले पैसे परत मिळवण्यासाठी लोक पोस्ट ऑफिसच्या फेऱ्या मारत आहेत. तसंच त्यांना या गोष्टीवर विश्वासही बसत नाही. कोरोना काळात आपल्या पतीला गमावणाऱ्या वर्षा बाथरी यांची कहाणी हृदयद्रावक आहे. कोरोना काळात त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचंही निधन झालं. आपल्या पतीनं मुलांच्या भविष्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये ९ लाख रुपयांची एफडी केली होती. परंतु आता सर्वकाही गडबड झाल्याचं समजलं आहे. इकडे कोणीही उत्तर देत नाही. आता काय करावं? असं त्या म्हणाल्या.
तर दुसरीकडे वृद्ध महिला किशोरीबाई यांनी पै अन् पै जमवून आपल्या मुलींच्या लग्नासाठी पाच लाख रुपये जमा केलेहोते. परंतु आता पोस्ट ऑफिसमध्ये कोणी उत्तर देत नाही. जमा केलेल्या रकमेचीही माहिती नाही. आता पासबुक बनावट असल्याचं सांगत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.