१८ हजार पगार, ४ आलिशान घरं, २९ एकर जमीन, बँकेत लाखो रुपये; कर्मचाऱ्याची संपत्ती पाहून अधिकारी चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 06:14 PM2022-02-23T18:14:46+5:302022-02-23T18:15:11+5:30
सरकारी कर्मचाऱ्याकडे सापडलेली माया पाहून अधिकारी चक्रावले
आर्थिक गुन्हे शाखेच्या उज्जैनमधील पथकानं देवास जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाच्या घरावर छापा टाकला. मंगळवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाईदरम्यान कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा झाला. कन्नौदजवळील डोकाकुई गुडबेल गावात असलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या संचालकाच्या घरावर ईओडब्ल्यूच्या पथकानं धाड टाकली. प्राथमिक तपासाताच त्यांच्या हाती कोट्यवधींची संपत्ती लागली. विशेष म्हणजे व्यवस्थापकाचा पगार केवळ १८ हजार रुपये आहे.
काळ्या पैशाच्या माध्यमातून आरोपी गोविंद बागवाननं २९ एकर जमीन खरेदी केली. छापेमारीदरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकाला चार घरांची माहिती मिळाली. या घरांची किंमत लाखोंमध्ये आहे. अतिशय आलिशान पद्धतीनं त्यांची बांधणी करण्यात आली आहे. १८ हजार रुपये पगारातून गोविंद बागवान यांनी इतकी मालमत्ता कशी काय उभारली असा प्रश्न पथकाला पडला आहे.
पत्नी आणि मुलाच्या नावावरदेखील बागवान यांनी बरीच संपत्ती ठेवली आहे. बागवानकडे २९ एकर जमीन आहे. तिची किंमत कोट्यवधींच्या घरात जाते. यासोबतच सोन्या चांदीचे दागिनेही घरात सापडले आहेत. घरातून ईओडब्ल्यूच्या पथकाला रोख रक्कमदेखील सापडली आहे. बागवान यांची अनेक बँकांमध्ये खाती आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. बागवाननं अनेक पॉलिसी काढल्या आहेत. त्याचीही कागदपत्रं घरात सापडली आहेत.
गोविंद बागवानच्या घरात खोटी कागदपत्रंदेखील सापडली आहेत. छापेमारी दरम्यान ईओडब्ल्यूच्या पथकानं घरातून बोगस पॅन कार्ड, मतदार ओळखपत्रं जप्त केली. या प्रकरणी बागवान विरोधात वेगळा गुन्हा नोंदवला जाऊ शकतो. ईओडब्ल्यूचे डीएसपी अजय कैथवास यांच्या नेतृत्त्वाखाली ही कारवाई करण्यात आली.