खासदार हुसेन दलवाईंचे ई-मेल हॅक, पैसे लुटणारे तिघे पोलिसांकडून ट्रॅप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 22:07 IST2018-10-27T22:06:07+5:302018-10-27T22:07:21+5:30
कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (वय ३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (वय ३२) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.

खासदार हुसेन दलवाईंचे ई-मेल हॅक, पैसे लुटणारे तिघे पोलिसांकडून ट्रॅप
मुंबई - राज्यसभा खासदार हुसेन दलवाई यांचा ईमेल आयडी हॅक करून पैसे लुटणाऱ्या तीन परदेशी आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (वय ३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (वय ३२) अशी या तीन आरोपींची नावे आहेत.
खासदार हुसेन दलवाई यांचा ईमेल आयडी हॅक करून दलवाई आर्थिक अडचणीत असल्याचे भासवून त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून मेलद्वारे पैसे या तीन भामट्यांनी मिळवले आणि आणखी रक्कम मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजताच दलवाई यांच्या खाजगी सचिवाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यांनतर तपासात गुन्हा करणारे आरोपी दिल्ली परिसरात असल्याचे समजले असता पोलिसांचे पथक या तपासासाठी नवी दिल्लीला रवाना झाले. तेथून कोनाते मोहम्मद (३१), ओकपेईफोह मायकल (वय ३१) आणि ओत्तरा एन गोलहाऊद (वय ३२) या तीन आफ्रिकन आरोपींना अटक करण्यात आली. या तिघांकडून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, डोंगल, मोबाईल, दोन हॅंडसेट्स आणि वेगवेगळ्या नावांचे एटीएम कार्ड्स, ७० हजार रुपये आदी संगणकीय साधने आणि पुरावे पोलिसांनी हस्तगत केले. या तीनही आरोपींना २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सायबर गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी दिली.