खा. डेलकर आत्महत्याप्रकरण: दादरा नगर हवेलीच्या प्रशासकांसह ९ जणांविरोधातील गुन्हा रद्द
By दीप्ती देशमुख | Published: September 8, 2022 08:24 PM2022-09-08T20:24:50+5:302022-09-08T20:26:25+5:30
दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडून आलेले खासदार मोहन डेलकर (५८) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली
मुंबई : खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी दादर नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक प्रफुल्ल खोडा पटेल यांच्यासह नऊ जणांवर मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केला. प्रफुल्ल कोडा पटेल व अन्य आठ जणांनी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलिसांनी नोंदविला होता.
दादरा नगर हवेलीचे सात वेळा निवडून आलेले खासदार मोहन डेलकर (५८) यांनी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी मरिन ड्राईव्ह येथील एका नामांकित हॉटेलमध्ये आत्महत्या केली. पटेल यांच्यासह नऊजणांकडून डेलकर यांची छळवणूक सुरू होती. त्यांच्याकडून डेलकर यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार डेलकर यांचा मुलगा अभिनव डेलकर यांनी पोलिसांत केली होती. त्यानंतर मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पटेल, तत्कालीन पोलीस अधीक्षक, उपजिल्हाधिकारी व अन्य सहा जणांवर डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला. गुन्हा रद्द करण्यासाठी पटेल यांच्यासह नऊ जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
न्या. पी. बी. वराळे व एस. कुलकर्णी यांनी पटेल व अन्य आरोपींवर मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला. 'याचिकाकर्त्यांच्या ( पटेल व अन्य आरोपी) यांच्या युक्तिवाद योग्य आहे आणि त्यात तथ्यही आहे. कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी गुन्हा रद्द करणे योग्य आहे,' असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे.
'सर्व बाबींचा विचार करता आम्हाला याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादात तथ्य आणि वस्तुस्थिती आढळते. कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर रोखण्यासाठी फौजदारी दंडसंहिता कलम ४८२ अंतर्गत न्यायालयाने अधिकारांचा वापर करणे योग्य आहे. अभिनव डेलकर यांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात येत आहे,' असे न्यायालयाने म्हटले.
मरिन ड्राईव्ह पोलिसांनी पटेल व आठ जणांवर ९ मार्च २०२१ रोजी डेलकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल व अट्रोसिटी कायद्यातील काही तरतुदींअंतर्गत गुन्हा दाखल केला.
पटेल, तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप कुमार सिंह, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, तत्कालीन उपजिल्हाधिकारी अपूर्वा शर्मा, उपविभागीय अधिकारी मनस्वी जैन, पोलीस निरीक्षक (सिल्वासा) मनोज पटेल, दादरा नगर हवेली प्रशासकीय विभागाचे अधिकारी रोहित यादव, राजकीय अधिकारी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. राजकीय नेते फत्तेसिंग चौहान आणि सिल्वासाचे तत्कालीन तलाठी दिलीप पटेल यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकारांचा गैरवापर करून जाणीवपूर्वक डेलकर यांच्या विरोधात कट आणि योजना आखून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप पोलिसांनी नोंदविला होता.
निकाल ५ जुलै रोजी राखून ठेवला आणि गुरुवारी निकाल दिला.
डेलकर मृत्यूपूर्वी एक वर्ष दबावात होते. डेलकर यांचे एसएसआर कॉलेज ऑफ फार्मसी अँड मॅनेजमेंट या संस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासन त्यांचा छळ करत होते. तसेच त्यांना आगामी निवडणूक लढवण्यापासून प्रशासन रोखत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला होता.