संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 01:10 PM2024-09-24T13:10:34+5:302024-09-24T13:12:30+5:30
Akshay Shinde Encounter Video : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्याचा एक व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला आहे.
Shiv Sena MP First Reaction On Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. अक्षय शिंदेचे एन्काऊंटर करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत यांनी अक्षय शिंदेचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. राऊत यांनी शिंदे-फडणवीसांना यावरून सवाल केला आहे. (MP Sanjay Raut has posted a video before the encounter of badlapur case accused Akshay Shinde)
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास येथे अक्षय शिंदेने गाडीत शेजारी बसलेल्या सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले आणि तीन राऊंड फायर केले. यात मोरे जखमी झाले. आणि त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदेंनी एक गोळी झाडली. त्यात अक्षयचा मृत्यू झाला.
अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून विरोधकांनी महायुती सरकारला घेरले आहे. अनेक प्रश्न या एन्काऊंटरबद्दल उपस्थित केले जात आहेत. त्यात खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
संजय राऊतांनी अक्षय शिंदेचा कोणता व्हिडीओ पोस्ट केला?
खासदार संजय राऊतांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, तळोजा कारागृहातून घेऊन जाताना अक्षय शिंदेचे हात बांधलेले होते आणि तोंडावर बुरखा होता. हे मुद्दे उपस्थित करत राऊतांनी शिंदे फडणवीसांना एक प्रश्न केला आहे.
व्हिडीओ शेअर करत राऊत म्हणाले, "याने पोलिसांवर हल्ला केला? अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होते, तेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता. त्यामुळे नक्की काय घडले? कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत? महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे", असा प्रश्न खासदार राऊतांनी केला आहे.
याने पोलिसांवर हल्ला केला?
अक्षय शिंदे याला पोलिस घेऊन जात होतेतेव्हा त्याचे हात बांधलेले व तोंडावर बुरखा होता.
त्यामुळे नक्की काय घडले?
कुणाला वाचविण्यासाठी शिंदे फडणवीस हा बनाव करत आहेत?
महाराष्ट्राला सत्य कळायलाच हवे।
@Dev_Fadnavis pic.twitter.com/wo2dvqoBBs— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2024
अक्षय शिंदेच्या आईचा गंभीर आरोप
मयत आरोपी अक्षय शिंदेच्या आईने या कारवाईवर गंभीर आरोप केले आहे. पैसे घेऊन मुलाला मारल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर शाळेत कामाला असलेल्या महिलांना का अटक करण्यात आलेले नाही? असा प्रश्नही अक्षयच्या आईने उपस्थित केला आहे.
या कारवाईबद्दल माहिती देताना देवेंद्र फडणवीसांनी आत्मसंरक्षणार्थ पोलिसांना गोळीबार करावा लागला असे सांगितले. आरोपींने रिव्हॉल्व्हर घेऊन गोळ्या झाडल्या. त्यामुळे पोलिसांनी गोळी झाडली, असे फडणवीस म्हणाले आहेत. मात्र, या घटनेने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून महायुती सरकार कोंडीत सापडल्याची स्थिती निर्माण झाली आहे.