पळवून नेलेल्या तरुणीची 3 दिवसात सुटका करणाऱ्या अप्पर पोलिस आयुक्तांचा खासदारांनी केला गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 04:47 PM2021-10-13T16:47:24+5:302021-10-13T16:49:00+5:30
Kidnapping case : प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला.
मुंबई- मालाड पश्चिम मालवणी परिसरात रहाणा-या एका युवतीला तीन दिवसांपूर्वी फसवून एका युवकाने पळवून नेण्याचा प्रकार घडला होता. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पडवळ यांच्या भाजपाचे वरिष्ठ नेते आर.यू.सिंह यांनी निदर्शनास आणून देताच या कार्यक्षम पोलिस आधिका-याने आपली सर्व शक्ती - युक्ती कामाला लावत तीन दिवसात या पळवून नेलेल्या युवतीला हैद्राबाद येथून सहीसलामत सोडवून तिच्या आई-वडिलांच्या सूपूर्द केले.
प्रविण पडवळ यांनी दाखवलेल्या चातुर्याबद्दल नुकताच उत्तर मुंबईचे खासदारगोपाळ शेट्टी यांनी त्यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला. राजकीय जिवनात काम करत असताना पोलिसांबरोबर अनेक वादाचे प्रसंग येतात, परंतू चांगले कामे करणाऱ्या पोलिस आधिका-यांचे कार्य समाजापुढे येणेही तितकेच गरजेचे आहे. मुंबईच्या बिघडलेल्या कायदा व सुरक्षेबद्दल चिंता व नाराजी व्यक्त करुन मुंबईतल्या कायदा व सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी प्रविण पडवळ यांच्या सारख्या कार्यक्षम पोलिस अधिकाऱ्यांची मुंबईला गरज असल्याचे प्रतिपादन खासदार गोपाळ शेट्टी यांनी या सत्कार प्रसंगी केले. चांगल्या कामांसाठी पोलिस व जनप्रतिनिधींनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तरुण युवतींची फसवणूक टाळण्यासाठी सर्वच पालकांनी दक्षता घ्यावी असेही आवाहन खासदार शेट्टी यांनी केले.