Mukesh Ambani: अंबानींना धमकी देणारा चालवतोय सोन्याचं दुकान, अफजल नावाने केला कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 09:49 AM2022-08-16T09:49:41+5:302022-08-16T09:51:40+5:30
५६ वर्षीय विष्णू भौमिक नावाच्या व्यक्तीला दहिसर येथून ताब्यात घेतले. तपासादरम्यान, या विष्णू नामक व्यक्तीने 'अफजल' नावाने हा फोन केला होता.
मुंबई - देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठी सुरक्षा आहे. मात्र, तरीही त्यांना अनेकदा धमक्या देण्यात आल्या आहेत. अँटिलिया धमकी प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आलेल्या धमकीच्या फोनने खळबळ उडाली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे ८ फोन आले होते. डी. बी. मार्ग पोलिसांनी फोन करणाऱ्या ५६ वर्षीय विष्णू भौमिक नावाच्या व्यक्तीला दहिसर येथून ताब्यात घेतले. तपासादरम्यान, या विष्णू नामक व्यक्तीने 'अफजल' नावाने हा फोन केला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एच.एन. रिलायन्स रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी साडेदहापासून फोन सुरू झाले. पावणेअकरा ते बाराच्या दरम्यान मुकेश अंबानी यांना धमकीचे तब्बल ८ ते ९ फोन आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळवताच पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मोबाइल क्रमांकांच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधले. विष्णू हा व्यवसायाने सोनार आहे. दक्षिण मुंबईत त्याचं सोन्याचं दुकान असून यापूर्वीही त्याने अशाप्रकारचे कॉल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विष्णू भौमिक विरुद्ध भादंविनुसार 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
धमकी देणारे पत्र
गतवर्षी फेब्रुवारीत अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र मिळाले होते. ती स्कॉर्पिओ मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यानेच तेथे ठेवल्याचे उघडकीस आले होते. ती गाडी देणारा मित्र मनसुख हिरण याने नाव उघड करू नये यासाठी वाझेने त्याची हत्या केल्याचे आढळले.