Mukesh Ambani bomb scare: माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत: विमल हिरेन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 05:08 AM2021-03-06T05:08:30+5:302021-03-06T05:08:48+5:30
Mukesh Ambani bomb scare: गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले आणि मृतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/ठाणे: मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, त्यांची पत्नी विमला यांनी पती आत्महत्या करूच शकत नसल्याचे सांगितले. तसेच गुरुवारी नेहमीप्रमाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने बोलावल्याचे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडल्याची बातमी कानावर पडल्याचे सांगितले आहे.
त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, आमची स्कॉर्पियो चोरी झाली होती. याबाबत रितसर विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली. अशात कार सापडल्यानंतर माझ्या पतीने वेळोवेळी गुन्हे शाखेला सहकार्य केले. त्यांनी जेव्हा जेव्हा बोलावले तेव्हा माझे पती तेथे हजर झाले. गुरुवारीही कांदीवली गुन्हे शाखेतून तावडे नावाच्या व्यक्तीने कॉल करून भेटण्यासाठी घोडबंदर येथे बोलावले. पतीने त्यांना भेटून येतो असे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री १०नंतर त्यांचा मोबाइल बंद लागला. त्यांचा शोध लागला नाही म्हणून आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली.
मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त चुकीचे आहे. कारण ते कधीच तणावात नव्हते. आयुष्यात असाही दिवस येईल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मी घटनास्थळी सर्वात आधी पोहोचलो नव्हतो: सचिन वाझे
उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणात सापडलेल्या स्कॉर्पियो मालक मनसुख हिरनच्या संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ उडाली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास अधिकारी असलेल्या सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत, तर वाझे यांनी फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत, कार सापडली तेव्हा आपण घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचलो नसल्याचे स्पष्ट केले.
फडणवीस यांनी स्कॉर्पियो सापडली तेव्हा स्थानिक पोलिसांच्या आधी वाझे घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप केला होता. यावर, बोलताना वाझे यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. 'माझ्या आधी तिथे अनेक यंत्रणा गेल्या होत्या. गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक एसीपी, डीसीपी झोन-२ आणि बीडीडीएसचे पथक आधी पोहोचले होते. त्यानंतर क्राइम ब्रान्चचे युनिट पोहोचले. त्यात मी होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोण आहेत सचिन वाझे?
एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेले सचिन वाझे यांनी आतापर्यंत ६३ एन्काउंटर केले आहे. घाटकोपर बेस्ट बसमध्ये २ डिसेंबर २००२ रोजी झालेल्या बॉम्ब ब्लास्टमधील संशयित ख्वाजा युनूसच्या मृत्यू प्रकरणानंतर वाझे यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर १५ वर्षांनी त्यांना पुन्हा सेवेत दाखल करून घेत सशस्त्र पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी सोपवली. या जबाबदारीनंतर त्यांनी टीआरपी घोटाळा, डीसी अवंती कार घोटाळा, फेक फॉलोअर्ससारखे मोठ्या घोटाळ्याला वाचा फोडली होती.
वाझे आणि ठाणे कनेक्शन
मनसुख हिरेन ठाण्यात राहतात. तसेच वाझेही ठाण्यात राहायला आहेत. वाझे यांनी ठाण्यातही काम केले आहे. अशात, स्कॉर्पियो सापडल्यानंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, ही स्कॉर्पियो आणि तिच्यासोबत असलेली इनोव्हा कार ठाण्यातून आली आणि पुढे यातील इनोव्हा ठाण्यातच जाते. या ठाणे कनेक्शनमुळे वाझे यांना चौकशीच्या घेऱ्यात उभे करण्यात येत आहे.
तावडे नावाचा
अधिकारी नाही!
कांदीवलीच्या गुन्हे शाखेत तावडे नावाचा कोणताही अधिकारी नसल्याची माहिती मुंबई पोलिसांकड़ून देण्यात आली आहे.. त्यामुळे तो अधिकारी कोण? तो अधिकारीच होता का? की आणखीन कोणी? मनसुख यांच्या मोबाईलवर आलेला तो कॉल नेमका कुणाचा? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
बातमी ऐकताच
पत्नी बेशुद्ध
मुंब्रा खाडीत आपल्या पतीचा मृतदेह आढळल्याचे कळताच हिरेन यांची पत्नी विमल हिरेन या बेशुद्ध पडल्या. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. रात्री त्यांनी पत्रकारांसमोर येत पती आत्महत्या करू शकत नसल्याचे ठामपणे सांगितले. हिरेन यांचे शेजारी आणि नातलग यांनीही त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला असून तपासात सहकार्य करणारी व्यक्ती आत्महत्या करू शकत नाही, असे म्हणणे मांडले.