बोलणी करण्यास आले अन् सोन्याचा हार चोरून गेले; डॉक्टर कुटुंबीयांची पोलिसांत धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:13 AM2022-04-27T06:13:34+5:302022-04-27T06:13:48+5:30
मुलुंडमधील घटना; फोटो व्हायरल करून बदनामीची दिली धमकी
मनीषा म्हात्रे
मुंबई : डॉक्टर मुलाचे लग्न करण्यासाठी वधूचा शोध सुरू असतानाच सोशल मीडियावरून एक स्थळ आले. स्थळ आवडले म्हणून बघण्याचा कार्यक्रम ठरला. त्यानंतर मात्र वराचे घर बघण्यासाठी आलेल्या वधूच्या कुटुंबीयांनीच मुलाच्या आईचा तब्बल साडे सात तोळ्याचा हार घेऊन पळ काढल्याची घटना मुलुंडमध्ये घडली. विशेष म्हणजे, मुलाच्या कुटुंबीयांनी वधू पक्षाला हार नेल्याबाबत विचारणा करताच वधूच्या आईने थेट काही फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून बदनामीची धमकी दिली. त्यामुळे मुलाचे लग्न ठरविणे एका कुटुंबाला चांगलेच डोकेदुखीचे ठरले आहे. मुलुंड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला आहे.
मुलुंड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, मुलुंड एलबीएस मार्गावर राहणाऱ्या ५३ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलीस अधिक तपास करत आहे. त्यांचे पती एका नामांकित रबर कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. तर मुलगा डॉक्टर आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलासाठी चांगल्या वधूच्या शोधात असताना, सोशल मिडियावर राजश्री घोडके व ईश्वर घोडके यांच्याशी 3 महिन्यापूर्वी ओळख झाली. घोड़के दाम्पत्य वेगवेगळी स्थळ दाखवत होते. २५ जानेवारी रोजी त्यांना घोडके कुटुंबियांचा लग्नासाठी प्रस्ताव पाठवला.
२३ एप्रिल रोजी भेटण्याचा कार्यक्रम ठरला. दुपारी २ च्या सुमारास वधू आई, वडील, बहीण आणि आजीसोबत येथील एका हॉटेलमध्ये भेटले. तेथे प्राथमिक बोलणी झाल्यानंतर, मुलीच्या कुटुंबियानी घर दाखवण्यासाठी आग्रह धरला. त्यानुसार, ५ च्या सुमारास सर्वजण त्यांच्या मुलुंडच्या घरी आले. घर बघत असताना फोटो काढण्याचा बहाणा करत मुलीच्या वडिलांनी यांचा पावणे चार लाख रुपये किंमतीचा ७ तोळे ७ ग्रँमचा हार तुटला असल्याचे सांगून बोलण्यात गुंतवून स्वतःकडे घेऊन निघून गेला. तक्रारदार यांनी मुलीच्या आईला फोन करून हार बाबत चौकशी केली. तेव्हा तिने तुझे फोटो व्हॉट्सअपवर टाकुन बदनामी करेन. हार विसरून जा, तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देत मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. घडल्याप्रकाराने तक्रारदार यांना धक्का बसला. याबाबत त्यांनी मुलुंड पोलिसांत तक्रार केली आहे.
मुलीचीही धमकी
२४ एप्रिल रोजी त्यांनी पुन्हा मुलीला कॉल करून हाराबाबत चौकशी केली. तेव्हा, मुलीने या लग्नाला आईचा विरोध असल्यामुळे घर सोडले आहे. मला तुमच्याच मुलाशी लग्न करायचे असल्याचे तिने सांगितल्याने काही तरी गडबड असल्याचा संशय तक्रारदार याना येताच त्यांनी, तात्काळ सोमवारी मुलुंड पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
तपास सुरू
महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत, तक्रारीची पडताळणी करण्यात येत आहे. चौकशीअंती योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबीरे यांनी दिली. तसेच मुलीचे कुटुंबीय कर्नाटकला असून ते आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.