विमानतळावर पकडली ४ कोटींची सोन्याची पेस्ट, अंतर्वस्त्रातून लपवून आणले ८ किलो सोने
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 05:58 AM2023-01-18T05:58:51+5:302023-01-18T05:59:26+5:30
दुबई येथून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे सोने असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलेले साडेचार कोटी रुपये मूल्याचे तब्बल ८ किलो सोने पकडण्यात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना यश आले आहे. याप्रकरणी दोन प्रवाशांना अटक केली आहे. विशेष म्हणजे तस्करी केलेल्या सोन्याची पेस्ट करण्यात आली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई येथून येणाऱ्या दोन प्रवाशांकडे सोने असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या अनुषंगाने डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सापळा रचला होता. दुबईतून आलेल्या या विमानातून प्रवासी बाहेर पडल्यानंतर अधिकाऱ्यांनी या दोन प्रवाशांची चौकशी केली. मात्र, सुरुवातीला त्यांच्या तपासणीमध्ये काहीच आढळले नाही. मात्र, सखोल तपासणीमध्ये या दोघांनी त्यांच्या अंतर्वस्त्रामध्ये सोन्याची पेस्ट केलेली पाकिटे लपविल्याचे आढळून आले. सोने तस्करीची ही नवीनच पद्धती पाहण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.