कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई गुन्हे शाखेने पाठवले समन्स
By पूनम अपराज | Published: January 7, 2021 06:40 PM2021-01-07T18:40:17+5:302021-01-07T18:41:27+5:30
Comedian Kapil Sharma Summons : याच प्रकरणात कॉमेडियन कपिल शर्माला आज सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईपोलिसांनी बनावट नोंदणी केलेल्या मोटारी जप्त केल्याची माहिती मिळाली होती. आता याच प्रकरणात कॉमेडियन कपिल शर्माला आज सीआययूचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांनी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
कपिल लवकरच चौकशीसाठी जाणार आहेत. पोलिसांनी सांगितले की, कपिल शर्माने प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्याविरूद्ध फसवणूकीचा आरोप दाखल केला होता. आता कपिलला साक्षीदार म्हणून त्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी बोलविण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केलेल्या अनेक गाड्या जप्त केल्या गेल्या आहेत. कपिल शर्माने कार डिझायनर दिलीप छाब्रियाविरोधात गुन्हा दाखल केला होता. कपिलने दिलीप यांच्यावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
याआधी मुंबई पोलिसांनी भारतातील प्रसिद्ध कार डिझायनर आणि कार मॉडिफिकेशन स्टुडिओ डीसी डिझाईनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. त्यांच्यावर मल्टीपल कार रजिस्ट्रेशन रॅकेट चालवल्याचा आरोप आहे. दिलीप छाब्रियाविरोधात भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 468, 471, 120 (बी) आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप यांनीच भारताची पहिली स्पोर्ट्स कार डिझाईन केली होती.
प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाने केली फसवणूक; पोलिसांनी केली अटक
बऱ्याच सेलिब्रिटींच्या गाड्या त्यांनी डिझाईन केल्या
अमिताभ बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत अनेक कलाकारांसाठी त्यांनी गाड्या डिझाइन केल्या आहेत. कारबरोबर ते सेलिब्रिटींच्या लक्झरी व्हॅनिटी व्हॅनदेखील डिझाइन करतात. कपिल शर्माकडेही दिलीपने डिझाइन केलेली व्हॅनिटी व्हॅन आहे.