तो आला, बोलला अन् ९ तोळ्याचं सोनं घेऊन पसार झाला...
By मनीषा म्हात्रे | Published: September 12, 2022 09:26 PM2022-09-12T21:26:17+5:302022-09-12T21:48:41+5:30
दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकीस्वारांसोबत केलं पलायन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: दुकानात रेती खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने बोलण्यात गुंतवून दुकानमालकाचे साडे चार लाख रुपये किंमतीचे ९ तोळ्यांचे दागिने पळविल्याची धक्कादायक घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी MIDC पोलिसांनी दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास केला. मालाड परिसरातील रहिवासी असलेले ६५ वर्षीय तक्रारदार यांचे अंधेरीत रेतीविक्रीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी १० च्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती दुकानात आला. त्याने मंदिराच्या कामासाठी रेतीची गोणी हवी असल्याचे सांगितले.
त्यानुसार, तीन गोणीचे बाराशे रुपये त्यांच्या समोर ठेवले. पुढे, सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान सुरु असल्याचे सांगत ठग ग्राहकाने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. पुढे बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील, अंगठी, सोनसाखळी हातात घेतली. त्यानंतर, टेबलावरील प्लास्टिक बॅगेत ठेवल्याचे दाखवून दुकानाबाहेर थांबलेल्या दुचाकी स्वारांसोबत तो निघून गेला. काही वेळाने त्यांनी प्लास्टिक बॅग उघडून पाहताच त्यात त्यांचे दागिने मिळून आले नाही. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यामध्ये त्यांचे साडे चार लाख रुपये किंमतीचे ९ तोळ्याच्या दागिन्यांवर ठगाने डल्ला मारला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहे.