Mumbai Cruise Drugs Case: आर्यन खानची रात्र तुरुंगात; आज जामीन मिळणार का? सगळ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 05:40 AM2021-10-04T05:40:55+5:302021-10-04T05:42:12+5:30
आलिशान जहाजावर ‘एनसीबी’ची धडक कारवाई; आठ जण अटकेत; बड्या उद्योगपतींच्या मुलींचाही समावेश, अटक झालेल्यांची नावे : आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नूपुर सारिका, इस्मित सिंह, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर व गोमित चोप्रा
मुंबई : मुंबईजवळ अरबी समुद्रात आलिशान जहाजावर सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) शनिवारी रात्री केलेल्या धडक कारवाईत बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. शाहरुखच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याचे समजताच बॉलीवूडसह देशभरात खळबळ उडाली. सर्व आरोपींना रविवारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावली. उर्वरित पाच जणांना आज, सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, आर्यन खानतर्फे ॲड. सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात बाजू मांडली. ‘एनसीबी’ने दोन दिवसांची कोठडी मागितल्यावर त्यांनी आर्यनवरील कलमे जामीनपात्र असल्याचा बचाव केला. मात्र, कोर्टाने तो अमान्य केला. आर्यनच्या जामिनासाठी सोमवारी अर्ज केला जाणार आहे. अलीकडेच गुजरातच्या मुंद्रा-अदानी बंदरावर जप्त केलेल्या १५ हजार कोटी रुपये मूल्याच्या ड्रग्जचा व कॉर्डेलियावरील ड्रग्ज पार्टीचा काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे.
पथकाने अशी केली कारवाई
मुंबईहून गोव्याला दोन दिवसांच्या सफरीवर निघालेल्या कॉर्डेलिया या आलिशान जहाजावर अमली पदार्थांचे सेवन केले जाणार असल्याची खबर ‘एनसीबी’ला मिळाली. त्यानुसार ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. २२ जणांच्या पथकाने जहाजावर प्रवासी म्हणून प्रवेश मिळवला. जहाजावर शनिवारी दुपारनंतर प्रवासी वाढू लागले. एका खोलीत ‘म्युझिक नाइट’ आणि ड्रग्ज पार्टीची जोरदार तयारी सुरू झाली. त्याच वेळी पथकाने आपली खरी ओळख दाखवत छापा टाकून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
आरोपींकडून काय जप्त? १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एक्स्टसीच्या २२ गोळ्या आणि १ लाख ३३ हजार रुपये रोख. सर्वांचे मोबाइल.
कोणत्या कलमांखाली अटक
आर्यन खान, मूनमून धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याच्या (एनडीपीएस ॲक्ट) कलम २७ (अमली पदार्थांचे सेवन करणे) ८ क (अमली पदार्थांचे उत्पादन, तयार करणे, बाळगणे, खरेदी किंवा विक्री करणे) तसेच अन्य संबंधित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती ‘एनसीबी’ने दिली. मूनमून व सारिका या दिल्लीतील बड्या उद्योगपतींच्या मुली असल्याचे समजते. त्यांच्याकडून कोकेन, एमडी, चरस तसेच अन्य काही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
आठ तास चौकशी
रविवारी पहाटे साडेतीन वाजता छापासत्र संपल्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना ताब्यात घेऊन अधिकारी ‘एनसीबी’च्या बॅलार्ड पीअर येथील कार्यालयात आले. आर्यन खान याने सुरुवातीला ड्रग्ज पार्टीशी आपला संबंध नसल्याचे सांगत बचावाचा प्रयत्न केला. मात्र, सखोल चौकशीनंतर आर्यनने सहभागाची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या सगळ्यांची तब्बल आठ तास चौकशी चालली. ड्रग्ज पार्टीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आठही जणांवर अमली पदार्थ सेवन व बाळगल्याच्या आरोपावरून अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर अटकेची कारवाई करून रविवारी सायंकाळी सर्व आरोपींना किल्ला न्यायालयात नेण्यात आले. शनिवारी रात्री सुरू झालेली ‘एनसीबी’ची कारवाई १२ तास चालली.