Mumbai Cruise Drugs Case: ऑपरेशन ‘कॉर्डेलिया क्रूझ’; पर्यटकांच्या वेशात ४८ तासांची फिल्डिंग, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:25 AM2021-10-04T06:25:53+5:302021-10-04T06:28:23+5:30
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मित्र हॉटेल व्यावसायिक कुणाल जानीला गुरुवारी एनसीबीने अटक केली होती.
जमीर काझी
मुंबई : देशभरात चर्चेचा विषय बनलेली क्रूझवरील ड्रग्ज पार्टी उधळून लावण्यात यशस्वी ठरलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ४८ तासांपासून ‘फिल्डिंग’ लावली होती. विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली २५ जणांचे पथक त्यामध्ये सहभागी झाले होते. पर्यटक बनून त्यांनी क्रूझवरील तीन दिवसांचे बुकिंग केले होते. मात्र, त्यातील कोठे कारवाई करायची आहे, याबद्दल कमालीची गुप्तता बाळगली होती. अनेकांना शेवटच्याक्षणी त्याबाबत कल्पना देण्यात आली होती.
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मित्र हॉटेल व्यावसायिक कुणाल जानीला गुरुवारी एनसीबीने अटक केली होती. त्याच्या चौकशीतून क्रूझवर होणाऱ्या पार्टीबद्दल माहिती मिळाली. क्रुझवरील पार्टीत सहभागी होण्यासाठी २२ जणांनी प्रवेशिका मिळवली. त्यानंतर त्यांनी शिताफीने ही कारवाई पूर्ण केली.
असे पार पडले ऑपरेशन ‘कॉर्डेलिया क्रूझ’
शनिवारी सकाळी अकरा वाजता विभागीय संचालक समीर वानखेडे, अधीक्षक विश्वविजय सिंह व अन्य २३ जणांनी पर्यटकांच्या वेशात क्रूझमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आतील सर्व भागाची पाहणी करून ४ वाजेपर्यंत आत येणाऱ्या प्रत्येकावर, त्यांच्या हालचालीवर नजर ठेवली. क्रूझवर पार्टीच्या मूडमध्ये असलेल्या आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज व इतर ६ जणांच्या हालचाली संशयास्पद जाणवू लागल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर विविध प्रकारचे ड्रग्ज मिळाले. त्यानंतर वानखेडे यांनी क्रूझच्या कॅप्टनला कारवाईची कल्पना देत नियोजित प्रस्थान रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यास सांगितले. क्रूझवर हजर असलेले १००० जण व ८० क्रूची झडती घेण्यात आली. ही कारवाई पूर्ण होईपर्यंत पहाटेचे साडेतीन वाजले. त्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह पाच पुरुष आणि दोन तरुणी वगळता इतरांना सोडून देण्यात आले.
आर्यन म्हणताे, मी तर केवळ पाहुणा...
आपण पाहुणे म्हणून जहाजावर गेलाे होताे. पार्टीत जाण्यासाठी आपणास पैसे भरावे लागले नव्हते. पार्टीच्या आयोजकांनी माझ्या नावाचा वापर करत इतरांना निमंत्रित केले होते, असे आर्यन खान सांगत होता. मात्र त्याच्या लेन्स किटमध्ये मिळालेले ड्रग्ज व अरबाज मर्चंटसोबत समोरासमोर केलेली चौकशी आणि आर्यनच्या मोबाईलवरील व्हॉट्स ॲप चॅट व क्लिप तपासल्यानंतर सर्व सत्य समोर आले.
सेलिब्रिटी आणि ड्रग्ज कनेक्शन...
संजय दत्त
तरुणपणी संजय दत्त ड्रग्ज घेत होता. संजयच्या जीवनावरील ‘संजू’ चित्रपटात हे सर्व संदर्भ आहेत. आई नर्गिस दत्त यांच्या निधनानंतर त्याचे ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढले होते. त्याला अमेरिकेतील रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवले होते.
फरदीन खान
अभिनेता फिरोझ खान यांचा मुलगा फरदीन खानला मुंबई पोलिसांनी ड्रग्जसह पकडले होते. कोकेनसह जुहू येथे पकडले होते.
प्रतीक बब्बर
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरने ड्रग्जच्या सवयीबद्दल माध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेण्यात आले होते. व्यसन सुटल्यानंतर त्याने चित्रपटांत पुनरागमन केले.
राहुल महाजन
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि बिग बॉस स्पर्धेतील सहभागामुळे चर्चेत राहिलेला राहुल महाजन ड्रग्जप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याच्यावर ड्रग्ज सेवनाचा आरोप होता आणि त्यासाठी त्याला तुरुंगातही जावे लागले होते.
क्रूझ कंपनी म्हणते, आमचा संबंध नाही
कॉर्डेलिया क्रूझच्या कंपनीकडूनही कारवाईबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले असून त्यांनी ड्रग्ज पार्टीशी कसलाही संबंध नसल्याचे सांगितले. दिल्लीतील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आमचा कसलाही संबंध नाही. प्रवाशांना तपासण्याची जबाबदारी पोर्टवरील यंत्रणेची असते. आम्ही याबाबत तपास यंत्रणेला सहकार्य करू, असे क्रूझची मालकी असलेल्या कंपनीचे अध्यक्ष व सीईओ जुर्गन बैलोन यांनी सांगितले. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब घेतला असून सोमवारी पुन्हा बोलाविण्यात आले आहे.
अशी रंगणार होती पार्टी
दिवस पहिला : शनिवार । मायामीमधला डीजे स्टेन कोलेवसोबत डीजे बुल्सआय, ब्राऊनकोट आणि दीपेश शर्माचा कार्यक्रम
दिवस दुसरा : रविवार । दुपारी एकपासून ते रात्री आठपर्यंत फॅशन टीव्हीच्या पूल पार्टीचे आयोजन. पूल पार्टीदरम्यान आयव्हरी कोस्टचा डीजे राऊलसोबत भारतीय डीजे कोहराचा कार्यक्रम. रात्री आठनंतर फॅशन टीव्ही पाहुण्यांसाठी शँपेन ऑल-ब्लॅक पार्टीचे आयोजन. रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत स्पेस मोशन आणि इतर कलाकारांचा संगीत कार्यक्रम. तिसरा दिवस : सोमवार । सकाळी दहा वाजता क्रूझ मुंबईत समुद्र किनाऱ्यावर परतणार होते.