Mumbai CST Bridge Collapse : ’त्या’ सहा जणांच्या मृत्यूस संबंधित अधिकारीच जबाबदार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 07:50 PM2019-03-18T19:50:32+5:302019-03-18T19:52:40+5:30
आरोपींना होवू शकते १० वर्षापर्यंत शिक्षा, गुन्ह्यात बदल
मनीषा म्हात्रे
मुंबई - सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यूप्रकरणी संबंधिताविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल होता. आता संबंधित प्रशासन, अधिकारी, ठेकेदारास पोलिसांनी मृत्यूस जबाबदार धरत, गुन्ह्यांत बदल केले आहेत. त्यांच्याविरुद्ध ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. त्यात त्यांना १० वर्षाची शिक्षा होवू शकते.
अंजुमन इस्लाम कॉलेज येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणारा दादाभाई नौरोजी मार्गावरील या पादचारी पूलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ६ जणांना प्राण गमवावा लागला, तर ३१ जण जखमी झाले आहेत. घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या आझाद मैदान पोलिसांनी गुरुवारी रात्री उशीरा याप्रकरणी पादचारी पूलाची देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी जबाबदार संबंधीत यंत्रणा, संस्था आणि त्याच्यासंबंधीत सर्व पदाधिकारी, व्यक्तींविरोधात भादंवी कलम ३०४ (अ), 337 आणि 338 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात आरोपींवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता. हा जामिनपात्र गुन्हा होता.
मात्र आता, आरोपींवर ३०४ अंतर्गत कारवाई होणार आहे. यातील आरोपीच ६ जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या गुन्ह्यांत बदल करण्यात आले आहेत. हा अजामिनपात्र गुन्हा असून, यात दोषींना १० वर्षापर्यंत शिक्षा होवू शकते.
तसेच पोलिसांनी पुलाचे स्ट्रक्चर आॅडीट, वर्क आॅर्डर तसेच पुला संबंधित कागदपत्रांवरुन यात कुणाची काय जबाबदारी होती? त्यानुसार, तपास सुरु केला आहे. याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या पूल विभागाचे मुख्य अभियंता संजय दराढे यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. तसेत, यातील जखमींचेही जबाब पोलीस नोंदवत आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात, लवकरच अटकेची कारवाई होवू शकते असेही पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले.