पोलीस तक्रारीनंतरही आजीबाईंचे खाते रिकामेच! सायबर ठगांनी दोन वेळा घातला गंडा
By मनीषा म्हात्रे | Published: September 12, 2022 06:25 PM2022-09-12T18:25:45+5:302022-09-12T18:27:55+5:30
चुनाभट्टी येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बँक खात्याची KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने डेबिट कार्डची माहिती आणि मोबाईलवर आलेले OTP घेत खात्यातून रक्कम लंपास केली. त्यानंतर खात्याची गोपनीय माहिती चोरी करून खात्यातील रकमेवर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार चुनाभट्टीमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.
चुनाभट्टी येथील रहिवासी असलेल्या राधा (७२) या एका फार्मास्यूटिकल कंपनीतून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे कॅनरा बँकेच्या चूनाभट्टी आणि धारवाड, नारायणपूर येथील शाखेमध्ये तीन स्वतंत्र बचत खाती आहेत. मार्च महिन्यात चूनाभट्टी येथील कॅनरा बँकेतून अमित मिश्रा बोलत असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून डेबिट कार्डची माहिती मिळवली. पुढे, मोबाईलवर आलेले ओटीपी घेत खात्यातून तीन व्यवहार करत दीड लाख रुपयांवर डल्ला मारला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, चुनाभट्टी पोलिसांनी भादंवि आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल केला होता.
राधा या ७ सप्टेंबरला बचत खात्यांच्या पासबुकमध्ये नोंदी करून घेण्यासाठी गेल्या. त्यांनी पासबुक तपासली असता तिन्ही बचत खात्यातून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिन्ही खात्यातून गैरव्यवहार करत एकूण ०३ लाख २५ हजार २२९ रुपये लंपास केले असल्याची माहिती त्यांना समजताच त्यांना पुन्हा धक्का बसला. त्यांनी, पुन्हा चुनाभट्टी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.