झोपलेल्या पत्नीजवळ रांगत आला दिव्यांग पती, चाकूनं छाती, पोटावर सपासप वार; मुंबईतील घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 02:20 PM2021-09-05T14:20:59+5:302021-09-05T14:23:00+5:30
मुंबईच्या साकीनाका येथील घटना; पोलिसांकडून आरोपीला अटक
मुंबई: दिव्यांग व्यक्तीनं पत्नीची हत्या केल्याची घटना मुंबईतील चांदिवलीत घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पत्नी झोपलेली असताना पतीनं तिच्यावर चाकूनं वार केले. त्यात तिचा मृत्यू झाला.
चांदिवलीत वास्तव्यास असलेल्या कोंडाबाई त्रिमुखे (वय ६७ वर्षे) त्यांच्या वन रुम किचनमध्ये झोपल्या होत्या. त्यावेळी त्यांचे पती शंकर यांनी त्यांच्यावर चाकूनं सपासप वार केले. शंकर यांनी ५ वर्षांपूर्वी त्यांचे दोन्ही पाय गमावले आहेत. रांगत रांगत पत्नीपर्यंत पोहोचलेल्या शंकर यांनी धारदार चाकूनं पत्नीच्या छाती, पोट आणि कमरेवर वार केले.
जखमी झालेल्या कोंडाबाईंना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शंकर यांना खून करताना त्यांच्या सुनेनं पाहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. वृद्ध दाम्पत्यामध्ये अनेकदा वाद व्हायचे अशी माहिती पवई पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 'शंकर त्रिमुखेंची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे ते वैतागले होते. मानसिक स्थिती ढासळल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते,' असं पोलिसांनी सांगितलं.
आरोपीची मानसिक स्थिती चांगली नसल्यानं त्यांच्याकडून हा गुन्हा घडल्याची माहिती पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डींनी दिली. शंकर यांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्यांच्या सुनेनं हा संपूर्ण प्रकार पाहिला. कोंडाबाई जीवाच्या आकांतानं ओरडत असताना घरात असलेल्या त्यांच्या सुनेला जाग आली. पोलिसांना घरातील भिंतीवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत.