Mumbai Drug Case: मुंबईमध्ये एनसीबीने पुन्हा केली मोठी कारवाई, विलेपार्लेमध्ये जप्त केले कोट्यवधीचे हेरॉईन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 10:24 AM2021-11-03T10:24:01+5:302021-11-03T10:24:39+5:30
Mumbai Drug Case: गेल्या काही दिवसांत मुंबईतील NCBकडून होणाऱ्या कारवाया काहीशा मंदावल्या होत्या. मात्र आता एनसीबीने पुन्हा एकदा सक्रिय होत एक मोठी कारवाई केली आहे.
मुंबई - मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर केलेली कारवाई आणि आर्यन खान याला केलेल्या अटकेमुळे एनसीबी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तसेच एनसीबीचे विभागीस संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे मुंबईतील एनसीबीकडून होणाऱ्या कारवाया काहीशा मंदावल्या होत्या. मात्र आता एनसीबीने पुन्हा एकदा सक्रिय होत एक मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने मुंबईतील विलेपार्ले परिसरात कारवाई करत कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केले आहे.
विलेपार्ले येथून कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केल्यानंतर एनसीबीने याची माहिती दिली. या कारवाईत कोट्यवधीचे हेरॉईन जप्त केल्याचे एनसीबीने सांगितले. तसेच या प्रकरणातील संशयित आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले. गेल्या १५ दिवसांपासून एकापेक्षा एक गंभीर आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण कक्ष (एनसीबी) बॅकफूटवर आला होता. गेल्या आठवड्यापासून एनसीबीने एकही कारवाई केलेली नव्हती. तसेच कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपासही थंडावला होता.
एनसीबीचे अधिकारी स्वत:च ड्रग्ज प्लांट करतात, पैसे उकळतात अशा स्वरूपाच्या २६ केसेसच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर कारवाया थांबविण्याचे आदेश दिले आहेत. जुन्या गुन्ह्यातील आरोपीही शोधले जात नाहीत, असा आरोपही झाला होता.