Mumbai drugs case: आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी अटकेत, पुणे पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 07:55 AM2021-10-28T07:55:53+5:302021-10-28T09:47:00+5:30
Aryan Khan drugs case: Aryan Khan drugs caseमधील पंच Kiran Gosavi याला अखेर पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.
पुणे - आर्यन खान ड्रग्स केसमधील पंच किरण गोसावी याला अखेर पुणेपोलिसांनी ताब्यात घेतले आहे. किरण गोसावी हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशपर्यंत जाऊन आले होते. मात्र तो हाती लागला नव्हता. किरण गोसावीने उत्तर प्रदेश पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्याचा प्रयत्न केला होता. तिथे नकार मिळाल्यानंतर तो पुण्यात आला होता. तिथे तो पोलिसांकडे आत्मसमर्पण करणार असल्याची चर्चा होती. मात्र रात्री पुणे पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
सध्या गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्स प्रकरणामध्ये किरण गोसावी हा पंच होता. तसेच आर्यन खानला ताब्यात घेताना तो समीर वानखेडेंसोबत दिसत होता. दरम्यान, किरण गोसावीचा अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईलने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आता पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर तो काय गौप्यस्फोट करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यानंतर त्याला फरासखाना पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे. तसेच त्याच्या अटकेची प्रक्रिया आजच पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra | Kiran Gosavi (NCB witness in the drugs-on-cruise matter) has been detained: Amitabh Gupta, Pune Police Commissioner
— ANI (@ANI) October 28, 2021
(File photo) pic.twitter.com/6AFxtn0Udq
एका जुन्या फसवणुकीच्या प्रकरणात किरण गोसावीला अटक करण्यात आली आहे. मात्र आता प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांप्रकरणीही त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, किरण गोसावी याने प्रभाकर साईलवरच गंभीर आऱोप केले आहेत. प्रभाकर साईलनेच २५ कोटी रुपये घेतल्याचा दावा किरण गोसावी याने काल केला होता. तसेच प्रभाकर साईल आणि त्याच्या भावाचे सीडीआर तपासल्यास सर्व माहिती समोर येईल, असा दावा त्याने केला.
किरण गोसावी याने आर्यन खानबरोबरचा फोटो व्हायरल केल्यानंतर तो चर्चेत आला होता. त्यानंतर पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल असून त्या तो फरार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआऊट नोटीस काढली होती. त्याचा शोध घेण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली होती. त्याचा शोध घेत असताना तो लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक लखनौला जाऊन धडकले होते. परंतु, हे पथक पोहचण्यापूर्वीच किरण गोसावी तेथून फरार झाला होता.
याप्रकरणी चिन्मय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. किरण गोसावी याने आपल्या फेसबुकवर मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. त्याला चिन्मय देशमुख या तरुणाने प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून ३ लाख रुपये घेऊन किरण गोसावी याने मलेशियाला पाठविले. मात्र, तेथे नोकरी न दिल्याने ते भारतात परत आले. त्यानंतर त्यांनी फरासखाना पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पुणे पोलिसांनी त्याच्या महिला मॅनेजरला अटक केली आहे. शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) असे तिचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलीस त्यांच्या मागावर होते.