मुंबईतून तडीपार केलेला गुंड पुन्हा जेरबंद; श्रीनगर पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: January 13, 2023 07:56 PM2023-01-13T19:56:07+5:302023-01-13T19:56:16+5:30
दिनकर हा मनाई आदेशाचे उल्लंघन करून किसननगर भागात मोकाट फिरत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली.
ठाणे - मुंबई, ठाण्यासह पाच जिल्हयांमधून हद्दपार केलेला दशरथ दिनकर हराळे उर्फ साई (२६, रा. शिवाजीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला चाकूसह श्रीनगर पोलिसांनी पुन्हा जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
वागळे इस्टेट भागात हाणामारीसह दहशत पसरविणारा गुंड दिनकर साई याला वागळे इस्टेट परिमंडळाचे तत्कालीन पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश ४ जानेवारी २०२३ रोजी दिले होते. तरीही दिनकर हा मनाई आदेशाचे उल्लंघन करून किसननगर भागात मोकाट फिरत असल्याची माहिती श्रीनगर पोलिसांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने १२ जानेवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून किसननगर क्रमांक तीनच्या भागातून दशरथला अटक केली. त्याच्या अंगझडतीत एक लोखंडी सुराही जप्त केला आहे. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा तसेच १४२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.