२००५ मध्ये UP तून मुंबईत आला अन् अल्पावधीत कोट्यधीश बनला; पोलिसांनी केली फेरीवाल्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 10:11 AM2021-08-14T10:11:33+5:302021-08-14T10:20:38+5:30
४३ वर्षीय संतोषकुमारसोबत पोलिसांनी त्याच्या पत्नीला आणि इतर ८ साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मुंबई – अनेकदा आपण ऐकलं असेल फेरीवाले अथवा रस्त्यावर भीक मागणारे भिकारी यांच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता असल्याचं आढळतं. मुंबईत काहीसा असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत फेरिवाल्याचं संघटीत गुन्हेगारीचं रॅकेट समोर आलं आहे. पोलिसांनी यात एका आरोपीला अटक केली आहे. संतोषकुमार सिंह उर्फ बबलू ठाकूर असं या आरोपीचं नाव आहे.
४३ वर्षीय संतोषकुमारसोबत पोलिसांनी त्याच्या पत्नीला आणि इतर ८ साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संतोषकुमारनं मुंबई, नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी सूलतानपूरमध्ये अनेक कोट्यवधीच्या मालमत्ता जमवली आहे. एकट्या मुंबईतच त्याच्या १० हून अधिक प्रॉपर्टी आहे. इमारतीसोबत अनेक चाळींमध्ये त्याची घरं आहेत. दादर, परळ, तुर्भे, कल्याणसारख्या परिसरात संतोषकुमारने त्याच्या आणि पत्नीच्या नावावर जमिनी घेतल्या आहेत. बाजारभावानुसार या जमिनींची किंमत १० कोटींपेक्षा अधिक आहे.
मिड-डेमधील रिपोर्टनुसार, संतोष कुमार आणि त्याच्या पत्नीने चाळींमध्ये घरं घेतली आहेत ज्याठिकाणी नजीकच्या काळात पुनर्विकास होण्याची शक्यता अधिक आहे. चाळीच्या माध्यमातून पक्की घरं घेऊन त्यात गुंतवणूक करायची असा यांचा धंदा आहे. त्यातून हे नफा मिळवत होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांनी दिली आहे.
अल्पावधीतच बनला कोट्यधीश
संतोष कुमार हा २००५ मध्ये मुंबईत पोटापाण्यासाठी आला होता. सुरुवातीला दादर स्टेशनबाहेर तो शेव्हिंग ब्लेड्स विकायचा. त्यानंतर त्याची काही गुन्हेगारांसोबत ओळख झाली. संपर्क वाढल्यानंतर त्याचा गुन्हे क्षेत्रात प्रवेश झाला. स्थानिक गुन्हेगारांना दारुची ऑफर देऊन त्याने रॅकेट चालवायला घेतलं. स्थानिक फेरिवाल्यांकडून ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाखाली धमकावायचा. दिवसाला ५०० ते ५ हजारापर्यंत हा हफ्ता असायचा.
काही काळात तो लाखोमध्ये कमाई करू लागला. त्यातील मोठा वाटा तो टोळीतील इतर सदस्यांनाही द्यायचा. त्यानंतर मुंबई, उपनगर, ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्ठानकांवरही त्याने शिरकाव केला. २०१० नंतर संतोष कुमार आणि त्याची पत्नी गावी जाण्यासाठी ट्रेनने नव्हे तर विमानाने प्रवास करायला लागले. २००६ मध्ये संतोषला अटक झाली होती. खंडणी, दरोडा, हत्येचा प्रयत्न असे विविध आरोप त्याच्यावर होते. ८ महिने जेलमध्ये होता. अनेक खटल्यात त्याला जामीन मिळायचा आणि तो बाहेर येऊन पुन्हा रॅकेट चालवायचा. त्यामुळे पोलीस हतबल व्हायचे परंतु आता पोलिसांनी संतोष कुमारवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
संतोषचा म्होरक्या कोण?
ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं संतोष कुमारला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु नाकाबंदी करत त्याला ठाण्याजवळ गाठलं. संतोषच्या गाडीमागे पोलिसांच्या गाड्या पाठलाग करत होत्या. थांबायला सांगूनही तो पुढे जात होता. अखेर ठाणे टोलनाक्याजवळ पोलिसांनी त्याला धरलंच. संतोष कुमार कुणाच्या इशाऱ्यावर हे काम करायचा त्याचा मास्टरमाईंड दक्षिण मुंबईतून रॅकेट चालवायचा असा संशय पोलिसांना आहे. पोलीस संतोषचा म्होरक्या कोण यादिशेने सध्या तपास करत आहेत.